महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांचा आज वाढदिवस. ते नागपूर नैऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. 31 ऑक्टोबर 2014ला वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री. त्यापूर्वी वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. फडणवीस म्हणजे विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाफ साधणारे एक दुर्मीळ राजकीय व्यक्तिमत्त्व होय.
‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली. त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही’, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलाने आईला ठणकावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री. त्यांचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. सोशल मीडियावरील ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा प्रत्यक्षात अवतरली आहे. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. ई. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे. राजकारण हे सामाजिक, आर्थिक बदल घडवून आणण्याचे एक साधन आहे, असा मुख्यमंत्री महोदयांचा दृढ विश्वास असून, आजपर्यंतची त्यांची 25 वर्षांची राजकीय कारकीर्द पाहता त्यात त्यांची हीच विचारधारा ठळकपणे दिसून येते. त्यांच्यामागे त्यांच्या वडिलांची आणि काकू शोभाताई यांची पुण्याई आहेच, पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वत:चे कष्टही महत्त्वाचे आहेत. सुरुवातीला त्यांनी मॉडेलिंग केले. ते 17 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षांत आपल्या कामाची चुणूक दाखवत, संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या 27व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर होण्याचा मान मिळविला. त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहता आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले. त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळविला. नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोन वेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदार पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2009 साली तिसर्यांदा विजय संपादन केला. विरोधी पक्षनेते म्हणून छाप पाडली. 2004 सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून आपले वजन वाढवले. 2019नंतर मुख्यमंत्री मीच असेन, असे सांगून त्यांनी सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामांवरचा विश्वास बोलून दाखविला. शिवसेनेला सोबत घेऊन यशस्वीपणे सरकार चालवून त्यांनी जनतेला विश्वास दिला, विकास दिला. वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा.
RamPrahar – The Panvel Daily Paper