

रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला. या जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेकाप विरुद्ध काँग्रेस अशाच व्हायच्या. या जिल्ह्यात भाजपचा जिल्हा परिषद सदस्यदेखील निवडून येत नव्हता, परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल), रवी पाटील (पेण) हे दोन आमदार निवडून आले. अपक्ष म्हणून निवडून आलेले महेश बालदी यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार झाले आहेत. या यशामुळे भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या जिल्ह्यात भाजप एक ताकद म्हणून उदयास आला आहे.
रायगड जिल्ह्यात युतीमधील शिवसेना, भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून, आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेसची ताकद कमालीची घटली असल्याचे विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापैकी 50.01 टक्के मतदान युतीच्या उमेदवारांना झाले असून, आघाडीच्या उमेदवारांना 39.15 टक्के मतदान मिळविण्यात यश आले. इतर पक्ष व अपक्षांना 8.77 टक्के मतदान झाले असून, 1.98 टक्के मतदारांनी नकाराधिकार बजावला आहे. जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान, तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडली. मतमोजणीवेळी जिल्ह्यातील मतदारांनी शिवसेना-भाजप महायुतीच्या बाजूने कौल दिला. सातपैकी पाच जागांवर युतीचे उमेदवार विजयी झाले, तर एका जागेवर महाआघाडी व एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला. रायगड जिल्ह्यात मतदारांनी शिवसेनेला सर्वाधिक 4 लाख 37 हजार 719 मते देऊन पहिल्या क्रमांकावर ठेवले असून, शिवसेना मोठा पक्ष ठरला आहे. शेकापला 3 लाख 15 हजार 331 मते पडली. भाजपने दोन मतदारसंघांत निवडणूक लढवून 2 लाख 91 हजार 489 मते पाडली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 1 लाख 76 हजार 236, काँग्रेस 85 हजार 554, अपक्ष 1 लाख 25 हजार 915, नोटा 29 हजार 188, बसपा 9 हजार 589, मनसे 8 हजार 807, वंचित 9 हजार 691 मते पडली आहेत. जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांनी लाखाच्या वर मते घेतली असून, काँग्रेस पक्षाला लाखाचाही आकडा गाठता आलेला नाही. जिल्ह्यात अलिबाग, महाड, श्रीवर्धन, कर्जत आणि उरण या पाच मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभे होते. पेण आणि पनवेल या दोन मतदारसंघांतून भाजपचे उमेदवार उभे होते. शेकापने अलिबाग, पेण, उरण, पनवेल या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप अशी आघाडी असताना श्रीवर्धन आणि महाड या ठिकाणी आघाडीचे उमेदवार उभे करण्यात आले होते, तर अलिबाग, पेण या ठिकाणी आघाडी असताना काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत दिली होती.
विधानसभा निकालात जिल्ह्यात अलिबाग, महाड, कर्जत या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. उरण आणि श्रीवर्धन या ठिकाणी शिवसेनेला अपयश आले. या पाचही विधानसभा मतदातसंघांत शिवसेनेला सर्वाधिक 4 लाख 37 हजार 719 मते पडली असून जिल्ह्यात सर्वाधिक मोठा पक्ष शिवसेना ठरला आहे. पेण आणि पनवेल या दोन ठिकाणी भाजपने निवडणूक लढवली असून दोन्ही मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. दोन्ही मतदारसंघांत मिळून भाजपला 2 लाख 91 हजार 489 एवढी मते पडली आहेत. शेकापने अलिबाग, पेण, उरण, पनवेल या चार मतदारसंघांत आपले उमेदवार उभे केले होते. या चारही ठिकाणी शेकापला पराभव पत्करावा लागला. चार विधानसभा मतदारसंघांत शेकापला 3 लाख 15 हजार 331 मते पडली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीवर्धन आणि कर्जत या ठिकाणी उमेदवार उभे केले होते. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीला यश आले असून कर्जतमध्ये पराभव झाला आहे. राष्ट्रवादीला दोन्ही मतदारसंघांत 1 लाख 76 हजार 236 मते पडली आहेत.काँग्रेस पक्षाने आघाडीमार्फत महाड, तर पेण, अलिबाग येथे मैत्रीपूर्ण लढत दिली होती. काँग्रेसचा तिन्ही ठिकाणी पराभव झाला असून एकूण 85 हजार 554 मते पडली आहेत. जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांना 1 लाख 25 हजार 915 मते पडली असली तरी काँग्रेसपेक्षा जास्त मते पडली आहेत. 29,188 मते नोटाला पडली. बसपाने पाच मतदारसंघांत उमेदवार उभे केले असून 9,589 मते पक्षाला पडली आहेत.
-प्रकाश सोनवडेकर, खबरबात
RamPrahar – The Panvel Daily Paper