नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने मॅट्टेओ पेलेकोन रँकिंग मालिका स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले आणि तिच्या गटात अव्वल स्थान मिळवले. जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी 26 वर्षीय विनेश टोकियो गेम्ससाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे. विनेशने 53 किलो वजनी गटात कॅनडाच्या डायना मेरी हेलन वेकरला 4-0 ने हरवले. गेल्या आठवड्यात विनेशने किवमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. स्पर्धेत प्रवेश करताना तिसर्या क्रमांकावर असलेल्या विनेशने 14 गुणांची कमाई करीत जागतिक क्रमवारीत आपले प्रथम स्थान परत मिळवले. विनेशने या स्पर्धेत एकही गुण गमावला नाही. विनेशला शनिवारी चार लढतींपैकी दोन वेळा पुढे चाल देण्यात आली. अन्य दोन लढतींपैकी विनेशने नंदिनी साळुंखे आणि कॅनडाच्या समंता स्टीव्हर्ट यांच्यावर मात केली. कझाकस्तानच्या तात्याना अमानझोल आणि इक्वेडोरची लुइसा एलिझाबेथ यांनी विनेशविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली होती. कोरोना काळातील विश्रांतीनंतर विनेशने सलग दुसरे सुवर्णपदक जिंकून सुयश मिळविले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper