अलिबाग येथे मानवी साखळी
अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात उभारण्यात येणार्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी 10 जून रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते चरी अशी 10 किलोमीटर लांबीची मानवी साखळी करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी मंगळवारी (दि. 8) पत्रकार परिषदेत दिली.
मानवी साखळी आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी अलिबाग येथील तुषार शासकीय विश्रामगृहात भाजपतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे हेही उपस्थित होते.
लोकनेते दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. नवी मुंबई उभारताना येथील शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्त, भूमिहीन जनता, ओबीसी जनता यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संबंध आयुष्य वेचले. अशा या लोकनेत्याचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, अशी मागणी आहे. त्यासाठी 10 जून रोजी पनवेल, उरण, नवी मुंबई, ठाणे येथे मानवी साखळी करण्यात येणार आहे. तशीच मानवी साखळी अलिबागमध्येदेखील करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता साखळी आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
या संदर्भात रायगडच्या जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतर मानवी साखळी केली जाईल. कोविडचे सर्व नियम पळून हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही अॅड. मोहिते यांनी या वेळी केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper