बेलापूर : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील 10 गावांपैकी दोन गावांतील 300 लोकांचे स्थलांतर शिल्लक राहिले असून हे स्थलांतर या महिनाअखेर होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळासाठी एकूण 2268 हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील 1061 हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. त्यामुळे सिडकोने गेल्या वर्षी या जमिनीवर बांधकाम सुरू केले आहे. विमानतळ उभारणार्या जीव्हीके कंपनीला 10 गावांखालील 671 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. विमानतळ धावपट्टी आणि टर्मिनलचा विकास आराखडा ही कंपनी तयार करणार आहे. त्यामुळे त्यांना सर्व जमीन मोकळी करून हवी आहे. सिडकोने 2886 पैकी केवळ आता 300 प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर करणे बाकी राहिले आहे. प्रकल्पग्रस्तांनी लवकर स्थलांतर करावे यासाठी सिडकोने प्रतिचौरस फूट 500 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर प्रमाण वाढले आहे. गावातील मंदिरासाठी सिडकोने भूखंड आणि बांधकामासाठी एक कोटी रुपये देऊ केले आहेत.
सिडकोच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका लवंगारे-वर्मा यांनी गावे लवकर स्थलांतरित व्हावी यासाठी गावाच्या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये एक विश्वास निर्माण होऊन ते स्थलांतराला प्रतिसाद देत होते. सुमारे तीन हजार प्रकल्पग्रस्तांपैकी आता केवळ 300 प्रकल्पग्रस्त गाव सोडून जाण्यास शिल्लक आहेत. ते येत्या काही दिवसांत घर निष्कासित करून गाव सोडतील, असा सिडकोला विश्वास आहे. गेले अनेक वर्षे राहिलेले गाव सोडताना ग्रामस्थांना दु:ख अनावर होत आहे. गाव सोडण्याच्या कल्पनेने अनेक प्रकल्पग्रस्तांनी जगाचा निरोप घेतला आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरांवर तुळशीपत्रे ठेवली आहेत. सिडकोने ग्रामस्थांना मोबदला चांगला दिला, पण त्याचे मोल गावाच्या बदल्यात चुकवावे लागत आहे. आता केवळ 300 ग्रामस्थ राहिले आहेत. तेही गावाच्या काही समस्या मार्गी लावाव्यात म्हणून थांबले आहेत. त्या येत्या काही दिवसांत सिडको मार्गी लावणार आहेत. इतर गावांतील
ग्रामस्थ गाव सोडून गेल्याने आता शिल्लक असलेल्या ग्रामस्थांचे मन गावात रमेनासे झाले आहे. त्यामुळे जड अंतकरणाने हे ग्रामस्थ गावाचा लवकरच निरोप घेणार आहेत.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर आता अंतिम टप्प्यात आले आहे. कोंबडभुजे व उलवातील केवळ 300 प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर आता शिल्लक असून त्यांच्या काही मागण्या मार्गी लागल्या की ते स्थलांतर होणार आहे.
त्यामुळे प्रकल्पाला गती येण्याची शक्यता आहे.
-अशोक शिनगारे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको
RamPrahar – The Panvel Daily Paper