विंडीजविरुद्ध भारत मजबूत स्थितीत
जमैका : वृत्तसंस्था
वेस्ट इंडिजविरुध्द सुरू असलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि मयांक अग्रवालच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने पाच बाद 264 धावांची मजल मारली आहे.
विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर लोकेश राहुल व मयांक यांनी सावध सुरुवात केल्यानंतर होल्डरने विंडीजला पहिले यश मिळवून दिले. त्याने राहुलला 13 धावांवर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या भारदस्त शरीरयष्टीच्या पदार्पणवीर रकहीम कोर्नवॉलकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर कोर्नवॉलने त्याच्या तिसर्याच षटकात भरवशाच्या चेतेश्वर पुजाराला अवघ्या सहा धावांवर बाद करून कारकिर्दीतील पहिला बळी मिळवला. 46 धावांवर दोन फलंदाज माघारी परतल्यावर कर्णधार कोहली व मयांक यांनी किल्ला सांभाळला. उपाहारानंतर मयांकने केमार रोचला चौकार लगावून कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 76 धावा केल्या, तर मयांकनेही 127 चेंडूंमध्ये 55 धावांची खेळी करीत भारताचा डाव सांभाळला. मागील सामन्यात उत्तम कामगिरी केलेल्या अजिंक्य रहाणेला या सामन्यात केवळ 24 धावा करता आल्या. दिवस अखेरीस भारताने पाच बाद 264 धावा केल्या. सध्या हनुमा विहारी (42), तर ऋषभ पंत (27) धावांवर खेळत आहेत.
वेस्ट इंडिजकडून कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्याने लोकेश राहुल, मयांक अग्रवाल व विराट कोहलीला माघारी धाडले. दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही, तर विंडीजच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. 143 किलो वजनी आणि सहा फूट पाच इंच उंचीच्या रहकीम कॉर्नवाल याने कसोटी सामन्यात पदार्पण केले. जहमार हॅमिल्टन यालाही संघात स्थान देण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper