कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
महापुरात नाला पार करीत असताना दहिगाव इंजिवली (ता. कर्जत) येथील विवेक भालेराव (वय 17) तरुण वाहून गेला होता. राज्य शासनाच्या वतीने मृत विवेकचे वडील बबन भालेराव यांना शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच गटारात पडून मृत्यू पावलेल्या माथेरानमधील युवराज या बालकाचे वडील धीरज वारीद्रे यांना देखील मंगळवारी (दि. 30) चार लाखाचा धनादेश देण्यात आला.कर्जत तालुक्यात 27 जुलै रोजी महापुराची स्थिती निर्माण झाली होती. त्या दिवशी दुपारी विवेक उर्फ बंटी बबन भालेराव नाला पार करीत असताना वाहून गेला होता. 28 जुलै रोजी सकाळी विवेकचा मृतदेह सापडला होता. या नैसर्गिक आपत्तीबद्दल मंगळवारी विवेकचे वडील बबन भालेराव यांना शासकीय मदतीचा 4 लाख रुपयांचा धनादेश शासनाचे वतीने दहिगाव येथे जाऊन सुपूर्द करण्यात आला. यावेळी कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार अविनाश कोष्टी आणि नायब तहसीलदार संजय भालेराव उपस्थित होते. 27 जुलै रोजी सायंकाळी माथेरानमध्ये युवराज धीरज वारीद्रे (वय 6) हा मुलगा गटारात पडून वाहून गेला होता. त्याचा गटारात अडकून मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या बालकाच्या कुटुंबीयांना नेरळ येथील मंडळ अधिकारी कार्यालयात तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार संजय भालेराव, नेरळचे मंडळ अधिकारी माणिक सानप, माथेरान नगरपालिकेचे गटनेते प्रसाद सावंत, आदिवासी विकास विभागाचा पेण प्रकल्पाचे अध्यक्ष संजय सावळा, नेरळ ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर, नितेश शहा, प्रथमेश मोरे, भाजप शहर अध्यक्ष अनिल जैन, भाजप तालुका चिटणीस प्रवीण पोलकम, भाजप प्रज्ञा प्रकोष्ट सेलचे कोकण संयोजक नितीन कांदळगावकर, शिवसेना शहर संपर्क प्रमुख किसन शिंदे, उपशहर प्रमुख बंडू क्षीरसागर, लालू शारवान उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper