नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरू होणारा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मध्यंतरीच्या काळात कर्णधार विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याबद्दल चर्चा सुरू होती, मात्र भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाच्या मते महेंद्रसिंह धोनी हा विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकावर येण्यास योग्य पर्याय आहे. तो एका वृत्तपत्र समूहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
‘सध्या धोनी चांगली फलंदाजी करतोय. त्यामुळे माझ्यासाठी विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी धोनी हाच एक योग्य पर्याय आहे. ज्या पद्धतीने त्याने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दौर्यात धावा काढल्या आहेत, तो नवोदित गोलंदाजांना मार्गदर्शन करतोय हे सर्व संघासाठी महत्त्वाचे आहे. दोन विश्वचषक आणि आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव असलेला धोनी हा विराटसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो’, अशा शब्दांत रैनाने धोनीचे कौतुक केले.
विश्वचषकाआधी भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-20 आणि पाच वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. विश्वचषकाआधी भारतीय संघाचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत धोनीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper