Breaking News

विष प्राशन केलेल्या इंजिनीअरचा मृत्यू

आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार  : खारघरमधील ओवेपेठ गावात राहणार्‍या संदेश प्रभाकर जोशी (24) या तरुणाने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. खारघरमधील रांजणपाडा येथे राहणारा रामकृष्ण कडू हा संदेशला उसने घेतलेली 11 लाख रुपयांची रक्कम परत करण्यासाठी वारंवार धमकावून मानसिक त्रास देत होता. त्यामुळे संदेशने आत्महत्या केल्याचे आढळून आल्याने खारघर पोलिसांनी रामकृष्ण कडू याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या घटनेतील मृत संदेश जोशी हा खारघरमधील ओवेपेठ गावात आई-वडील व भाऊ यांच्यासह राहण्यास होता. तसेच तो सिव्हिल इंजिनीअर म्हणून काम करत होता. डिसेंबर महिन्यामध्ये संदेशने रांजणपाडा गावात राहणार्‍या रामकृष्ण कडू याच्याकडून कामासाठी 11 लाख रुपये घेतले. 31 जानेवारीला संदेशचा साखरपुडा असल्याने त्याच्या कुटुंबीयांकडून साखरपुड्याची तयारी सुरू होती.

यादरम्यान, रामकृष्ण कडू हा संदेशने उसनवारीने घेतलेल्या 11 लाख रुपयांऐवजी त्याच्याकडे 22 लाख रुपये परत मागत होता. त्यासाठी तो त्याला वारंवार धमकावून मानसिक त्रास देत होता. त्यामुळे तणावाखाली आलेल्या संदेशने 28 जानेवारीला विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तो बचावला. त्यावेळी संदेशने, रामकृष्ण कडू हा पैशांसाठी वारंवार धमकावत असल्याचे आई-वडिलांना सांगितले होते. दोन दिवसांनंतर संदेशला रुग्णालयातून घरी आणल्यानंतर 30 तारखेला पुन्हा त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला अपोलो रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. 3 फेब्रुवारीला  त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संदेशच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी खारघर पोलीस ठाण्यात रामकृष्ण कडू याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रामकृष्ण कडूविरोधात आत्महत्येस प्रवृत्त

केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply