धुळे, ठाणे : प्रतिनिधी
मुसळधार पावसात वीज कोसळून धुळ्यामध्ये दोन बालकांचा, तर ठाणे जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही ठिकाणी मिळून चार जण गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
धुळे जिल्ह्यातील पाडळदे या गावात झाडावर वीज कोसळली. या वेळी झाडाखाली आसरा घेतला असलेला पंकज ज्ञानेश्वर राठोड (14) याचा जागीच मृत्यू झाला असून, लखन राठोड (6) आणि हितेश राठोड (10) हे दोघे जखमी झाले आहेत. यात एका म्हशीचाही मृत्यू झाला आहे, तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथे दुसर्या घटनेत दीपाली गिरासे (15) हिचा वीज कोसळून मृत्यू झाला.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात वज्रेश्वरी रस्त्यावर असलेल्या झिडके गावाजवळील उंबरपाडा या आदिवासी वस्तीच्या ठिकाणी वीज कोसळल्याने शेतात काम करणार्या प्रमिला मंगल वाघे (20) या महिलेचा मृत्यू झाला आहे. यात प्रमिला यांच्या आई अलका वाघे (52) आणि बहिणीचा मुलगा विजय अजय बोंगे (4) जखमी झाले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper