बारामती ः प्रतिनिधी
‘मविआ’मध्ये सहभागी काँग्रेसची नाराजी पुन्हा समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही खदखद शनिवारी कार्यकर्त्यांसमोर मांडली. शिवाय लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. या सगळ्या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. लोणावळा येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावरच निवडणूक लढवणार. मी जे बोललो त्यात माघार घेणार नाही. त्यामुळे कामाला लागा. मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितले. मग मी बोललो तर त्रास का होतो, असा सवाल उद्धव ठाकरेंना उद्देशून केला, तर पुण्यात आपल्या लोकांची कामे होत नसल्याने पुण्याच्या पालकमंत्रिपदी काँग्रेसचा व्यक्ती बसवण्याची शपथ घ्या, असेही आवाहन पटोले यांनी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करीत कार्यकर्त्यांना केले होते. त्यामुळे ‘मविआ’तील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत शरद पवार यांनी रविवारी (दि. 11) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी पटोले यांनी केलेल्या विधानाबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, या गोष्टीत मी पडत नाही. नाना पटोले वगैरे ही लहान माणसे आहेत. मी त्यांच्यावर कशाला बोलू? सोनिया गांधी बोलल्या असत्या, तर मी बोललो असतो.
RamPrahar – The Panvel Daily Paper