वय वाढल्याने लोकप्रियतेवर अजिबात परिणाम न होणे हेदेखील कलाकारचे खूप मोठे यश. शाहरूख खान याचे उत्तम उदाहरण. तो साठीचा झाला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी देश विदेशातून त्याचे अनेक फॅन वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड येथील त्यांच्या मन्नत बंगल्यावर प्रचंड गर्दीने जमले हे विशेष. तो आपल्या कुटुंबासह अलिबाग येथील आपल्या फार्महाऊसवर वाढदिवस साजरा करत मुंबईत आला. ही बातमी ट्रेंडिगवर होती. हा आज लोकप्रियतेचा निकष झाला आहे. सोशल मीडियात तुम्ही नेमके कुठे आहात हे महत्त्वाचे आहे आणि त्यातही शाहरूख फॉर्मात आहे.
अशातच शाहरूखची भूमिका असलेल्या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित किंग या चित्रपटाची धमाकेदार पूर्वप्रसिद्धी सुरू झाली. हा आपल्याकडील मारधाड दृश्याचे अर्थात ऍक्शन पॅक्डचे सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट आहे. तब्बल दीडशे कोटी त्यासाठी खर्च झालेत. म्हणजेच व्हीएफएक्स आणि एआय यांचा भरपूर भरपूर वापर झाला असणार. त्यात शाहरूखच्या अभिनयाला वाव तो किती असेल? मोठाच प्रश्न.
शाहरूखची भूमिका असलेल्या यशराज फिल्म्स निर्मित व आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे चित्रपटाचा चित्रपटगृहातील मुक्काम तब्बल तीस वर्षांचा झाला हा तर विश्वविक्रम. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 रोजी मुंबईत न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात दिवसा तीन खेळ या प्रमाणे प्रदर्शित झाला आणि पहिल्याच खेळापासून सुपरहिट. तेथे पन्नास आठवड्याचा खणखणीत मुक्काम केल्यावर चित्रपट मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला शिफ्ट करण्यात आला आणि आजही तो सुरूच आहे. एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स संस्कृतीची ही खासियत.
हे सगळे घडत असतानाच शाहरूख खानला अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अटली दिग्दर्शित जवान या चित्रपटातील अभिनयासाठी तो देण्यात आला. अनेकांना तो पटला नाही, रूचला नाही आणि ते बरोबरच आहे. ‘जवान’मधील शाहरूखचा अभिनय हा एक्स्प्रेशन्स कमी आणि त्यात व्हीएफएक्स एआय रिमिक्स यांचा वापर भरपूर अशी होती. तरी त्याचा सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी का बरे विचार केला जावा? शाहरूखने यापेक्षा गौरी शिंदे दिग्दर्शित डिअर जिंदगी या चित्रपटात चांगला अभिनय केला होता, त्यातील अभिनयासाठीच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात यायला हवा होता अशीही समाजमाध्यमातून प्रतिक्रिया उमटली.
एक आठवण सांगतो, करण जोहर दिग्दर्शित ’माय नेम इज खान’च्या पूर्वप्रसिद्धीला सुरुवात होत असतानाच आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांना शाहरूखशी संवाद साधण्यासाठी वांद्र्याच्या बॅण्ड स्टॅन्डवरील मन्नत बंगल्यावर बोलावले असता लिफ्टने वर गेलो ते एकदम मोठ मोठ्या शो केसमध्ये जड जड पुस्तके असलेल्या प्रशस्त रूममध्ये! क्षणभर वाटले की आपण चुकलो की काय? आम्ही एकमेकांशी नजरेने बोललो आणि अर्थातच त्या पुस्तकांवरून गप्पांना सुरुवात झाली. यालाच टायमिंग साधणे म्हणतात. गप्पांना एक निमित्त मिळते. एसआरके अर्थात शाहरूख खानचे सर्वात मोठे विशेष म्हणजे, तो अशा प्रकारे आम्हा मोजक्याच सिनेपत्रकारांच्या सहवासात असू देत अथवा त्याच्या कोणत्याही चित्रपटाची भव्य (अक्षरशः भव्य… पंचतारांकित हॉटेलमधील बॉल रूम भरतो इतक्या व अशा) पत्रकार परिषद असू देत, ’फक्त आणि फक्त तो एकटाच’ तास दीड तास अगदी सहज बोलणार. एकदम भारी कपॅसिटी. प्रश्न कसाही असू देत, तो नीट ऐकणार. फुलटॉस असेल तर छान फटकवणार, गुगली असेल तर खेळून काढणार, बाऊन्सर असेल तर छान हसत सोडणार. ही जणू व्यक्तीकेंद्रित गोष्ट आहे, पण ती शाहरूखला जमते. तो अतिशय फोकस्ड असतो. आपण काय बोलतोय यावर त्याचे नियंत्रण असते. हाच मीडिया आपल्याला जगभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवणार आहे याचे कॅलक्यूलेशन त्याला जमलंय. हा गुण आमिर खान व सलमान खानमध्येही दिसतो.
शाहरूख खान कधी कधी अभिनेता असतो, अनेकदा मात्र तो जणू प्रॉडक्ट असतो. पक्का प्रोफेशनल असतो. तो नव्वदच्या दशकात मनोरंजन क्षेत्रात आलाय. ती तर कार्पोरेट युगाची सुरुवात होती. तो ’सर्कस’, ’फौजी’ या राष्ट्रीय दूरदर्शनवरच्या मालिकेत भूमिका करत असतानाच अभिनेता म्हणून अनेकांना आवडत होता. हा त्याच्या कामाला सकारात्मक प्रतिसाद होता. आजही जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील राज कंवर दिग्दर्शित ’दीवाना’ (1992)चा मुहूर्त आठवतोय. दिग्दर्शक शेखर कपूर, राहुल रवैल हेदेखील हजर होते. एसआरके आणि दिव्या भारतीने त्या मुहूर्त दृश्यातही रंग भरला. फोटो फ्लॅश झाल्यावर शाहरूख थेट आम्हा सिनेपत्रकारांजवळ आला. त्याची एकूणच देहबोली, एक्प्रेशन आणि बोलणे यावरून तो कमालीचा फोकस्ड आहे हे जाणवले. माणूस पटकन वाचता येणारा असतो तो हा असा. खरंतर त्याने हेमा मालिनी दिग्दर्शित ’दिल आशना है’ (1993) साईन करत सिनेमात पाऊल टाकले. दिव्या भारतीच्या तारखा मिळत नसल्यानेच तो चित्रपट थोडा मागे पडला इतकेच, पण शाहरूख म्हणजे ड्रीम गर्ल दिग्दर्शिका हेमा मालिनी यांचे फाईंड, पण ’दीवाना’ (1992) अगोदर रिलीज झाला. त्यातील एसआरकेचा परफार्म, लूक पन्नासच्या दशकातील दिलीपकुमारची आठवण करून देणारा असेच आम्ही समिक्षकांनी म्हटले. विशेषत: अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित ज्वार भाटा, मेहबूब खान दिग्दर्शित अंदाज यातील दिलीपकुमारची शाहरूख आठवण देत होता…
दीवाना तसेच अब्बास मुस्तान दिग्दर्शित ’बाजीगर’ आणि यश चोप्रा दिग्दर्शित ’डर’ या तिन्हीतील शाहरूखच्या नकारात्मक व्यक्तिरेखांना रसिकांनी अक्षरशः तुडुंब, तुफान म्हणतात असा रिस्पॉन्स दिला. एसआरके स्टार झाला.
‘करण अर्जुन’ इत्यादीतील एसआरकेचा उत्स्फूर्त स्क्रीन प्रेझेन्स रसिकांना आवडला. तरी यशराज फिल्मचा आदित्य चोप्रा दिग्दर्शित ’दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ इतका आणि असा जबरा हिट होईल असे वाटले नव्हते. जे काही असेल ते असो. यातील एसआरकेचा ’राज’ आणि काजोलची ’सिमरन’ अशी फ्रेश जोडी होती. आज जर आपण हिंदी चित्रपटाच्या एकूणच प्रवासावर ’फोकस’ टाकायचा तर तो रमेश सिप्पी दिग्दर्शित ’शोले’ पूर्वीचा आणि नंतरचा हिंदी चित्रपट असाच टाकताना ’शोले’ ते ’डीडीएलजे’ आणि नंतर दुसरा टप्पा असा टाकावा लागेल. चित्रपट अभ्यासक्रमात तसाच फोकस पडावा. आपल्या देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते आणि त्यात डीडीएलजे आला. तेव्हाच्या नवीन पिढीची भाषा बोलणारा, मानसिकता व जीवनशैली असणारा असा हा ग्लोबल युगातील रसिकांना आवडेल असाच रोमॅन्टीक चित्रपट असा काही सुपर हिट ठरला की एसआरके सुपर स्टार झालाच, पण मग याच ’राज’च्या प्रतिमेत तो अडकला. तीच भूमिका तो अधिकाधिक खुलवून पुन्हा पुन्हा साकारतोय असे यश चोप्रा दिग्दर्शित ’दिल तो पागल है’, करण जोहर दिग्दर्शित ’कुछ कुछ होता है’ आणि ’कभी खुशी कभी गम’, आदित्य चोप्रा दिग्दर्शित ’मोहब्बते’ यात तो ’राज’च दिसतोय.
एसआरके आता जगभरातील हिंदी चित्रपटाच्या फॅन्सचा हीरो झाला. या काळात तो शीमित अमिन दिग्दर्शित ’चक दे इंडिया’ आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ’स्वदेस’मध्ये चाकोरीबाह्य होता हे दिग्दर्शकांचे यश. त्यांनी त्याच्यातील एसआरके सेटबाहेर ठेवला. या शाहरूखला मानाचे पुरस्कार प्राप्त व्हायला हवे होते. त्याच्यासारख्या कमालीच्या आत्मकेंद्रित अथवा ’मै हूं ना’ मानसिकतेच्या स्टारची इमेज कॅश केली जाते. एसआरकेने पाठीमागे हाल फैलावलेच पाहिजेत, ती त्याची सिग्नेचर स्टाईल. एखाद्या भावपूर्ण दृश्यात अडखळत बोलायलाच हवे, रोमॅन्टीक दृश्यात कमालीचे उत्कट असायलाच हवे, आपल्या पर्सनालीटीने संपूर्ण पडदा व्यापून टाकलाच पाहिजे ही समीकरणे हिट आणि फिट. यासाठीच त्याचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले जाऊ लागले. अर्थात, इंग्लिश बाबू देशी मेम वगैरे काही चित्रपट पडलेही (ते कोणालाच चुकत नाही), पण एसआरके स्थिर राहिला. या सगळ्यात एकीकडे तो रूपेरी पडद्यावरच्या आपल्या रोमॅन्टीक गाण्यात कमालीचा खुलू लागला. सदाबहार देव आनंद आणि सुपर स्टार राजेश खन्नाप्रमाणे त्याच्या व्यक्तिमत्वातच प्रेम प्रेम प्रेम आहे असे त्याच्या रोमॅन्टीक सॉग्जमध्ये दिसू लागले.
शाहरूखने रेड चिली एन्टरटेन्मेन्ट अशी स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था काढून आपला व्यावसायिक बाणा वाढवला. आयपीएल टीमचा मालक बनणे, अनेक जाहिरातीत चमकणे, ‘कौन बनेगा करोडपती’चा एक सिझन खेळवणे, अवॉर्ड फंक्शनमध्ये तो बोलता बोलता अनेकांची टर उडवू लागला, हसत खेळत शाब्दिक कोटी करू लागला अशीही वाटचाल सुरू झाली. एसआरके सगळीकडे असेल, दिसेल, हवाच अशा पद्धतीने हे आकाराला येत गेले. एक प्रकारचे अतिदर्शन होते, पण एसआरके असाच असू शकतो असे काहीसे चित्र निर्माण झाले. स्वत:चे मार्केटिंग कसे असावे आपणच स्पेस कशी वापरावी याचे हे उत्तम उदाहरण.
शाहरूखच्या अतिशय छोट्या छोट्या गोष्टीत विशेष रस घेत असलेल्या फॅन्स आणि फॉलोअर्सना नक्कीच याची कल्पना असेल की, त्याने चक्क मेहमूदही साकारलाय आणि मेहमूदचे चाहते म्हणत असतील आपल्या अफाट प्रतिभा, विनोदाचे सही टायमिंग, अनेक प्रकारचे गेटअप आणि व्यक्तिरेखा यातून असा काही जबरा ठसा उमटवलाय की त्याचं रुपडं घेण्याचा मोह कोणालाही होणारच. हा योग आला होता, मेहमूद दिग्दर्शित ’दुश्मन दुनिया का’ (1996) या चित्रपटाच्या वेळी! मेहमूदची चित्रपट दिग्दर्शनाचीही एक वेगळी परंपरा आहे. त्यातील ’कुंवारा बाप’ (1974) अगदी सर्वोत्कृष्ट. हसवता हसवता हेलावून टाकतो. पण हा सूर त्याला ’एक बाप छे बेटे’, ’जिनी और जॉनी’, ’जनता हवालदार ’ अशा चित्रपटात अजिबात सापडला नाही. ’दुश्मन दुनिया का’ मध्ये स्वतः तोच हीरो होता हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच. असे कॉमेडीयन चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन करताना कायमच मोठ्या स्टार्सना गेस्ट अॅपिरियन्स मोठ्या प्रमाणावर भरती करतात. ’कुंवारा बाप’मध्येही धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीवकुमार, अमिताभ बच्चन इत्यादी अनेक स्टार छोट्या छोट्या भूमिकेत होतेच. ’दुश्मन दुनिया का’ त्याला अपवाद कसा असेल? अशोककुमार, जितेंद्र, सलमान खान, जॉनी लिव्हर असे करता करता शाहरूखही आहे. तो इतरांना मदत करताना बद्रूचे रूप धारण करतो, रिक्षा चालवतो (‘कुंवारा बाप’मध्येही मेहमूद त्या काळातील रिक्षा चालवतो, आणि गातोही), बहुतेक शाहरूख कडे बराच वेळ असावा त्यामुळे त्याच्या भूमिकेची लांबी थोडी थोडी करताना वाढलीय अथवा मेहमूदनेच त्याची शक्य तितक्या प्रमाणात दृश्ये चित्रीत केली असावी. तो खूप अगोदरच्या काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असल्याने ’स्टारचा वेळ कसा अधिकाधिक प्रमाणात वापरायचा’ याची उत्तम जाण असणारच. गंमत म्हणजे या चित्रपटात मेहमूदचा मुलगा मन्सूर अली हीरो आहे, पण लक्षात राहिला बद्रूच्या रुपातील मेहमूदची आठवण देणारा शाहरूख! पाहुणा म्हणून आला आणि भाव खाऊन गेला. आणि तुम्हालाही माहित्येय की, शाहरूखला प्रत्येक गोष्टीत भाव खाऊन जायला फार आवडते….
चल, छैया छैया… गाणे अगदी असेच भारी हिट. एव्हाना तुमच्या डोळ्यासमोर अतिशय निसर्गरम्य ठिकाणी धावत्या ट्रेनच्या टपावर शाहरूख खान, मलयका अरोरा आणि ज्युनियर डान्सर छान डान्स करत करत हे गाणे एन्जॉय करताहेत आणि आपणही ऐकताना अथवा बघताना थ्रील होतो हे लक्षात येईल. मणि रत्नम दिग्दर्शित ’दिलसे’ (1998) या चित्रपटातील हे बंपर हिट गाणे आहे हे वेगळे सांगायला नकोच. दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या चित्रपटाच्या ऑडियोचे अतिशय ग्लॅमरस प्रकाशन झाले तेव्हाच हे रोमांचक गाणे पाहून सगळे थ्रील झाले. पहिल्यांदाच ऐकताच काही गाणी हिट होतात अथवा आवडतात, त्यातीलच हे गाणे आहे. विशेष म्हणजे साहित्यिक गीतकार म्हणून ओळखले जात असलेल्या गुलजार यांनी हे फिल्मी गाणे लिहिले, तर संगीतकार ए.आर. रहेमानने अतिशय उत्तम ठेका पकडून हे गाणे कॅची केले. सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी यांनीही अतिशय दिलखुलासपणे गायले. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन मणी रत्नम यांचे. दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटातील एक मोठे नाव.
हे गाणे आजही जबरा लोकप्रिय आहे. आणि त्यामुळेच हा चित्रपट आठवतोय. या चित्रपटात काय होते हे फारसं महत्त्वाचं वाटतं नाही…
अब्बास मस्तान दिग्दर्शित ’बाजीगर’ (1993) या म्युझिकल रहस्यरंजक मुव्हीजची पटकन आठवण आली असेलच. या चित्रपटाच्या यशाने शाहरूखची काही काळ ’निगेटीव्ह हीरो’ अशीही इमेज झाली होती, पण हा चित्रपट सुपर हिट झाल्यावर शाहरूख खान आणि काजोल ही जोडी जमली, अनेक चित्रपटांत दिसली. तशीच शाहरूख आणि शिल्पा शेट्टी ही जोडी का जमली नाही? शिल्पा शेट्टीचा तर हा पहिलाच चित्रपट आणि तोही सुपर हिट. म्हणजे तिला पुन्हा शाहरूखसोबत चित्रपट मिळायला हवे होते. या चित्रपटातील या जोडीवरचे ’किताबे बहुत सी पढी होगी तुमने’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. तर शाहरूख ’बदले की आग मे’ शिल्पाला उंच गच्चीवरुन ढकलून देतो. एकूणच चित्रपटात शिल्पाला जास्त फूटेज नसल्याने तिला पुन्हा शाहरूखची नायिका करण्यात अन्य दिग्दर्शकांना फारसे महत्त्वाचे वाटले नसेल तर त्यात अजिबात आश्चर्य नाही, तर शाहरूख तसा आपल्या नायिका निवडीबाबत फारच चोखंदळ आणि दक्ष. त्याने जुही चावला, काजोल, माधुरी दीक्षित आणि रानी मुखर्जी यांच्यासोबत चित्रपट स्वीकारण्यात विशेष रस घेतला आणि अन्य नायिकांसोबत एकाद दुसरा चित्रपट स्वीकारला. त्यात शिल्पा शेट्टीच्या ग्लॅमरस इमेजला साजेसा त्याचा चित्रपटच नसेल तर? दिग्दर्शकापेक्षा त्याचा ’आपली नायिका निवडीबाबत जास्त अधिकार असतो’ ही रिअॅलिटी कधीच लपली नाही. नायिकांची पिढी बदलल्यावर त्याने करिना कपूर, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा यांना जास्त पसंती दिली. या सगळ्या सेटअपमध्ये त्याला कुठेच शिल्पा शेट्टी ’फिट’ वाटली नाही यात आश्चर्य नको हो. तसा तो पक्का व्यावसायिक आणि व्यवहारी आहे. आपली जोडी पडद्यावर कोणासोबत शोभेल? आपल्या चित्रपटाच्या सेटवर शूटिंगच्या वेळी कोण आपलंस वाटेल? कोण आपलं ’मी मी मी’ डायजेस्ट करेल हे तो सगळे पाहतो. त्यात शिल्पा शेट्टी ’सूट’ होत नसेल तर? आणि महत्वाचे म्हणजे कोणत्याच पटकथेत, दिग्दर्शकाच्या व्हीजनमध्ये ही जोडी अजिबात अॅडजेस्ट झाली नसेल तर? एक लक्षात घ्या, पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटात ’नायक आणि नायिका’ यांची ’जोडी क्या बनाई ’ हा फंडा वितरकांसाठीही महत्त्वाचा असतो. तेव्हा, कभी कभी जितने के लिए हारना भी पडता है और हार कर जो जिता है उसे बाजीगर कहते है… तसेच आहे हे.
शाहरूखची भूमिका असलेला एक महत्वाचा चित्रपट जियो हा 2018चा एक महागडा चित्रपटही प्रेम त्रिकोणच, पण थोडा वेगळा. त्यात एकाच वेळेस भावुकता आणि झगमगाट यांना सामावण्याचा दिग्दर्शक आनंद एल. राय याने प्रयत्न केला आहे. या चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीत कसलीही कमतरताही ठेवली नाही. त्याच्या अफाट खर्चात एक सामाजिक मराठी चित्रपट सहज निर्माण व्हावा. शाहरूखलाही एका सुपर हिट चित्रपटाची गरज कायमच असतेच म्हणा.
शाहरूख खान म्हणजे ’किंग ऑफ रोमान्स ’ही ’दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ (1995) पासूनची लोकप्रिय प्रतिमा. पडद्याभर आपलेच साम्राज्य असावे असे त्याला मनोमन वाटतं असे अनेक चित्रपटात जाणवले. शाहरूख म्हणजे प्रचंड उर्जा, कॅमेरासमोरचा अगदी सहज वावर. त्याचे वाढते वय पाहता त्याने ’डिअर जिंदगी’सारखे चित्रपट करायला हवे हे वेगळे सांगायला नको. त्याने यात बुटका साकारलाय.
पडदा व्यापून टाकणे आणि आपल्या व्यक्तिरेखेत आपल्या सर्व मॅनॅरिझमने रंग भरणे हे शाहरूखला आवडते हे आपण अनेक वर्षे पाहतोय. विशेष म्हणजे तो स्वतः आपल्या चित्रपटाचा भरपूर आनंद घेतोय.
- दिलीप ठाकूर, चित्रपट समिक्षक
RamPrahar – The Panvel Daily Paper