मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरामध्ये तिथीनुसार साजरी केली. सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेकडून शिवजयंती साजरी करण्यात आली. असे असतानाच राज्यात सत्तेत असणार्या शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणजेच राष्ट्रवादीच्या एका आमदाराने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याला विरोध केलाय. त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये दुमत असल्याचे स्पष्ट होत आहे.
19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रासहीत जगभरामध्ये साजरी झाली. संभाजीराजे तसेच शाहू महाराजांच्या वंशजांनीही शुभेच्छा 19 तारखेलाच दिल्या. महात्मा फुलेंनी याच तारखेला शिवजयंती साजरी केली. 2000 साली महाराष्ट्र शासनाने अधिकृत तारीख घोषित केली ती पण हीच आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. तिथीच्या नावाखाली वाद उकरून काढायचा आणि महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करायचे हे धंदे आता महाराष्ट्रात बंद झाले पाहिजेत अशी तरुणांची इच्छा आहे, असा टोला मिटकरींनी शिवसेनेचा थेट उल्लेख न करता लागावलाय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला साजरी होते, महात्मा गांधीची जयंती 2 ऑक्टोबरला साजरी होते, राजमाता जिजाऊसाहेबांची जयंती 12 जानेवारीला साजरी होते. पंडित जवाहरलाल नेहरुंची जयंती 14 नोव्हेंबरला साजरी होते. छत्रपती संभाजी राजेंची जयंती 14 मे रोजी साजरी होते, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच हा वाद का?, असा प्रश्न मिटकरींनी
उपस्थित केलाय.
राज्य सरकारची नेमकी भूमिका काय?; भाजपच सवाल
मुंबई : शिवजयंती तिथीनुसार की तारखेनुसार यावर सोमवारी विधीमंडळात जोरदार चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केल्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे आहे, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री शिवजयंती साजरी करत असतील तर सरकार म्हणूनही आज शिवजयंती साजरी करण्याचा आदेश द्या, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.
आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती असून मुख्यमंत्री स्वत: एका कार्यक्रमाला गेले. मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहेत. अनेक आमदारांनी महाराजांना वंदन केले. जयंतीच्या दिवशी जे महामानव आहेत त्यांचे फोटो लिफ्टसमोर ठेवले जातात आणि सदस्य पुष्प अर्पण करतात अशी प्रथा आहे. मात्र, अधिकारी मानत नाहीत. विधीमंडळात आज फोटो लावला नाही. त्यामुळे राज्य सरकारची नेमकी भूमिका काय? असे मुनगंटीवार म्हणाले.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper