
पनवेल : वार्ताहर
येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात पदाधिकार्यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, शिवजयंती साजरी करीत असताना शोभायात्रा संपूर्ण शहरातून जात असल्याने 10 वाजेपर्यंतचे बंधन पाळणे खूप अवघड जाते. त्यामुळे शिवप्रेमींची तारांबळ उडते. त्यामुळे समस्त शिवप्रेमींच्या भावनांचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रात्री 12 वाजेपर्यंत साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी. शिवप्रेमी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत आले आहेत. यापुढेसुद्धा आम्ही ते करू.निवेदन देतेवेळी सकल मराठा समाजाचे विनोद साबळे, गणेश कडू, मधुकर घारे, शशिकांत गोरे, तुषार सावंत, विशाल ढगे, विनोद शिंदे, नंदकुमार शिर्के, तेजस सोनावणे, अमित सावंत, रवींद्र घारे, गणेश मुळीक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper