पनवेल : प्रतिनिधी
कोविड 19मुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून 31 मार्च 2021 रोजी तिथीनुसार होणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ साधेपणाने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यालाच अनुसरून पनवेल महानगरपालिकेने शहरातील शिवजयंती मंडळांनी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाइक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नये. त्याऐवजी शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावे.कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे व्याख्यान, गाणे, नाटक, असे सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क किंवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक शिबिरे, उपक्रम आयोजित करण्यास शिवजयंती मंडळांनी प्राधन्य द्यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. या वेळी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम जसे की मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे विशेष लक्ष देण्यात यावे, असे निर्देश शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper