Breaking News

शिवसंग्राम प्रतिष्ठानतर्फे नानोशी येथे शिवजयंती उत्साहात

पनवेल : रामप्रहर

पनवेल तालुक्यातील नानोशी येथील शिवसंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा हिंदू परंपरेप्रमाणे तिथीनुसार जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

पहाटे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पनवेल वरून शिव ज्योत आणण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले माणघर गावचे संजुभाई पाटील आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते महाराजांचा अभिषेक व पूजन सोहळा करण्यात आला. यानंतर सह्याद्रीचा पहाडी आवाज शिवशाहीर रायगड भूषण वैभवजी घरत यांच्या आवाजात मर्दानी पोवड्याचा कार्यक्रम सादर झाला. तसेच सीमेवर सध्या कार्यरत असणारे संदीप बोकडे आणि सेवा निवृत्त सैनिक मेजर दीपक कुरकुडे, उदय भोसले यांचा प्रतिष्ठान मार्फत मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

श्रीमाणिकगडावर गड संवर्धनाचे कार्य करणार्‍या स्वराजाचे वैभव या संस्थेचा सुद्धा सन्मान करण्यात आला तसेच या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी पनवेलचे उद्योगपती संजयजी पाटकर, भागवताचार्य महेशजी महाराज, नितीन पाटील, दापोलीचे माजी सरपंच सुभाष म्हात्रे, माजी सभापती प्रकाश जितेकर, ग्रामपंचायत नानोशीचे उपसरपंच वैभव पाटील, स्वराज्याचे वैभव, श्री शिवप्रतिष्ठान पनवेल, श्री शिवप्रतिष्ठान पळस्पे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समिती, श्री राम कला, क्रिडा मंडळ चिरनेर, मराठा साम्राज्य संघटना पनवेल,शिव गर्जना मित्र मंडळ, करंजाडे आदींची उपस्थिती लाभली.संध्याकाळी 4 वाजता ढोल ताशाच्या आणि टाळ मृदुंगाच्या गजरात आणि महाराजांच्या जय घोषात शिवछत्रपतींची पालखी काढण्यात आली, या पालखी सोहळ्यामध्ये मर्दानी खेळाची विविध प्रातिक्षिके सव्यासाची गुरुकुलम कोल्हापूर यांच्या मार्फत सादर करण्यात आली. शिवछत्रपतींच्या या पालखी मिरवणुकीची सुरुवात नानोशीमधून होऊन माणघर, मोसारे, पाटणोली या गावांमध्ये फिरून पुन्हा नानोशी गावात सांगता करण्यात आली.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply