अलिबाग : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर घुसणे रायगड जिल्ह्यातील शेकाप आणि राष्ट्रवादीच्या चार आमदारांना भोवले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 149प्रमाणे आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील व आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. एकूण 1646 जणांवर ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी या सर्वांना नोटीस पाठवली आहे. याशिवाय 37 इसमांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दपारीचे प्रस्ताव करण्यात आले आहेत, तर अभिजित कडवे याला 107प्रमाणे प्रतिबंधक कारवाईची नोटीस देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी मतदान केंद्रात बेकायदेशीर घुसून आमदार जयंत पाटील, पंडित पाटील यांनी एका पत्रकाराला मारहाण केली होती. या वेळी पेणचे आमदार धैर्यशील पाटील, विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे हेही उपस्थित होते. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात या चौघांविरुद्ध मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते.
त्यानुसार अलिबाग पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. त्याचप्रमाणे ज्या पत्रकाराला मारहाण झाली त्या पत्रकाराने दिलेल्या तक्रारीनुसार आमदार जयंत पाटील व आमदार पंडित पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण आमदारांना भोवले असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तशा नोटिसा त्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत व्हावी यासाठी प्रशासन प्रतिबंधात्मक कारवाई करीत असते. ज्यांना या नोटिसा बजावण्यात येतात त्या व्यक्तींनी कायद्याचे पालन केले नाही, तर त्यांच्यावर 188नुसार कायदेशीर कारवाई केली जाते. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 1646 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. त्यात या चार आमदारांचादेखील समावेश आहे, तर अभिजित कडवेला 107प्रमाणे प्रतिबंधक कारवाईची नोटीस देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चार आमदारांना 149नुसार नोटीस बजावली आहे. निवडणूक काळात त्यांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. त्यांनी ते केले नाही, तर त्यांच्यावर 188नुसार कारवाई केली जाईल.
-के. डी. कोल्हे, पोलीस निरीक्षक,
अलिबाग पोलीस ठाणे
RamPrahar – The Panvel Daily Paper