नवी मुंबई ः बातमीदार
कोरोना महामारीमुळे बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकर्यांचा शेतमाल बांधावरच नाश पावतोय. त्याला उठाव नाही. अशा परिस्थितीत शेतकरी उभा राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नवी मुंबईतील यूथ कौन्सिल नेरूळच्या माध्यमातून शेतकर्यांच्या मदतीसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यांच्या शेतमालास वाजवी भाव मिळावा आणि नागरिकांनाही योग्य दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी शेतकर्यांच्या मदतीसाठी ग्राहक सेवा हा उपक्रम संस्थेच्या नेरूळ येथील सेक्टर-9मधील सावली रोपवाटिकेत संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. त्याचा उद्घाटन समारंभ ज्येष्ठ पत्रकार, लेखक, अभिनेते प्रकाश राणे यांच्या हस्ते सोमवारी झाला. यूथ कौन्सिल नेरूळ समाजसेवी संस्था गेली 32 वर्षे नवी मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे कार्यरत आहे. कोरोनाच्या महामारीत गरजू नागरिकांना विविध स्तरावरून होत असलेल्या मदतीत संस्थेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी संस्थेचे सुभाष हांडेदेशमुख, रमेश सुर्वे, अशोक महाजन, भालचंद्र माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper