
मुंबई ः प्रतिनिधी
रोहा, तळा, म्हसळा, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील मुंबई निवासी कार्यकर्त्यांचा मेळावा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि. 7) सायंकाळी चार वाजता मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय जनता पार्टीचे सरकार पुन्हा देशात आल्यामुळे आपल्याही मतदारसंघात या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झाले पाहिजे. भाजपचा आमदार आला पाहिजे याअनुषंगाने सदर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार निरंजन डावखरे यांनी मुंबईवासीयांना मार्गदर्शन केले. पक्षाने विधानसभा निवडणुकीअगोदर सदस्य नोंदणी व नवमतदार नोंदणी असे उपक्रम दिले आहेत. ते प्रामाणिकपणे राबवा, यश हमखास मिळेल. कृष्णा कोबनाक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येईल व या सरकारमध्ये श्रीवर्धन मतदारसंघ असला पाहिजे, तरच अधिक चांगला विकास आपल्या गावांमध्ये करता येईल. मुंबईकरांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडावी. श्रीवर्धन मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत व तीन महिन्यांनंतर विधानसभा निवडणूक आहे. आपणास या मतदारसंघात परिवर्तन करायचे आहे. याकरिता आपल्या सर्व मित्रपरिवाराला भाजप सदस्य करा. नवमतदार नोंदणी करा. विकासाबद्दल चिंता करू नका. याकरिता भाजप सक्षमपणे काम करीत आहे. अधिक सक्षम संघटन करा, असे त्यांनी मुंबईकर बांधवांना सांगितले. कार्यक्रमाला मतदारसंघातील पदाधिकारी व मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईकर कार्यकर्त्यांना गावाच्या विकासासाठी भाजपला साथ द्या. सदस्य व्हा, मतदार नोंदणी करा, संघटित व्हा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. सर्व मतभेद, गटबाजी बाजूला ठेवून भाजप-शिवसैनिकांनी एकत्रित काम केल्यास यश हमखास मिळेलच. पुढील तीन महिने आम्ही जनतेत जाऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊ. सब का साथ, सब का विकास, हा मूलमंत्र घेऊन भाजप काम करीत आहे. यावर्षी नक्की बदल होईल, असे श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी जाहीर केले. मेळाव्याकरिता अॅड. संदीप महाडिक, महेश पाटील, गोविंद भायदे, रघुनाथ भायदे, मंगेश महात्रे, श्रीकांत नाकती, परशुराम नाकती, मीनाताई टिंगरे, प्रमोद राऊत, हनुमान सावंत, वैभव कदम, रमेश पोटले आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper