सत्ता पणाला लावायची की नाही हे शिवसेनेने ठरवावे : चंद्रकांत पाटील; नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपचा शिवसेनला सवाल

मुंबई : प्रतिनिधी

औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावर पुन्हा एकदा जोर देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेत भाजपाची सत्ता आली, तर पहिल्याच सभेत नामांतराचा ठराव मंजूर करू, असा दावा करीत सत्ता पणाला लावायची की नाही हे शिवसेनेने ठरवावे, असे पाटील यांनी म्हटले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले, आम्हाला यात राजकारण आणायचे नाही. मी आधीच बोललो आहे की औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, अहमदनगरचे नाव अंवती करावे. हे सगळे श्रद्धेचे विषय आहेत. शेवटी राम जन्मभूमी मुक्त होण्याचा विषय सगळ्यांनी स्वीकारला. मुस्लिमांनीही स्वीकारला. तो अस्मितेचा विषय होता. मंदिर होण्याचा नाही, राम मंदिर या देशात किमान 10 हजार असतील. औरंगजेब कुणाचा पूर्वज असू शकतो का, मग औरंगाबाद या नावाचा आग्रह कशासाठी. औरंगाबादऐवजी दुसरे नाव असेल, तर त्याची चर्चा करा. संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य आहे. मग ते का द्यायचे नाही, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.  विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी असा निर्णय घेतला. पण त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान मिळाले. त्यानंतर सरकारने प्रस्ताव मागे घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे याची सगळी प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. महापालिकेत करावी लागेल, नंतर राज्य सरकारला करावे लागेल. नंतर केंद्राकडे पाठवावा लागेल. महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. पहिला प्रस्ताव रद्द झाला, तर नव्याने प्रस्ताव करायला हवा होता. आम्ही असे आश्वासन लोकांना देतो की, आम्हाला महापालिकेत सत्ता द्या, पहिल्या बैठकीत संभाजीनगरचा ठराव मंजूर करू. काँग्रेसने याला विरोध केला आहे. त्यामुळे हा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावण्यासाठी सत्ता पणाला लावायची की नाही, हे शिवसेनेला ठरवायचे आहे आणि तिथेच राजकारण आहे. किंवा शिवसेनेने काँग्रेसची मन परिवर्तन करावे, असा सल्ला पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply