Breaking News

‘सदाचार-संस्कृतीचे जतन होणे काळाची गरज’

पाली : प्रतिनिधी

मानवी कल्याणासह राष्ट्र उत्कर्षासाठी सदाचार व संस्कृतीचे जतन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत चंद्रानन सागर मुनी महाराज यांनी शनिवारी (दि. 11) पाली येथे केले.

राष्ट्रसंत चंद्रानन सागर मुनी महाराज सध्या रायगड जिल्हा दौर्‍यावर असून, शनिवारी पालीतील आराधना भवनात एका कार्यक्रमात ते बोलत होते. अमुल्य असलेल्या मानवी जीवनात प्रत्येकाने आदर्श जीवन आचारसंहितेचे पालन करुन प्रत्येक जिवाला जगण्याची समान संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जैन धर्म प्रेम, मैत्री व करुणेची शिकवण देणारा मानवतावादी धर्म आहे. त्याग व वैराग्यमय हे जैन धर्माचे वैशिष्टे आहे. प्रत्येक व्यक्तीने सरळमार्गाने सन्मानाने जगावे ही शिकवण देण्याकरीता जैन धर्माचा विश्वव्यापी प्रचार सुरु आहे, असे राष्ट्रसंत चंद्रानन सागर मुनी महाराज यांनी यावेळी सांगितले.

मानवी उत्कर्षासाठी शिक्षण हे महत्वाचे असून ज्ञानी व शिक्षित व्यक्ती इतरांना दिशा दाखविण्याचे काम करतात. देश व विश्वभरात चंगळवाद, भोगवादाचे उत्थान सुरु आहे. तसेच हॉटेल्स, बार, पब यामध्ये युवापिढी बरबाद होत आहे. त्यांचा वेळ व धन वाया जात आहे. यापासून युवापिढीला वाचवून सक्षम राष्ट्रनिर्माणाकामी योगदान देण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे चंद्राननन सागर मुनी महाराज म्हणाले. यावेळी मनन महाराज, विक्रम परमार यांच्यासह जैन बांधव व भाविक उपस्थीत होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply