कर्जत : प्रतिनिधी
सेवा हे साध्य नसून साधन आहे व सेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणे, देश वैभवाला नेणे हे संघाचे ध्येय्य आहे आणि त्यासाठी आपल्या दीड लाख सेवाकार्यांच्या माध्यमातून संघ गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताचे सह प्रांत सेवा शिक्षण प्रमुख शिरीषराव देशमुख यांनी कर्जत येथे शुक्रवारी (दि. 25) केले. रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या वतीने कर्जत दहिवली येथील माऊली सभागृहात रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी झाले, त्यावेळी देशमुख बोलत होते. जनकल्याण समितीचे कोकण संभाग कार्यवाह अविनाशराव धाट यांनी प्रास्ताविकामध्ये जनकल्याण समितीच्या वतीने जिल्हा आणि प्रांतांमध्ये चालणार्या उपक्रमांची माहिती दिली तसेच रुग्णोपयोगी साहित्य केंद्रामध्ये फाऊलर बेड, व्हील चेअर, वॉकर, कमोड चेअर, वॉकिंग स्टीक, एअर बेड इत्यादी प्रकारचे साहित्य उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले. सेवा देणार्यांनी आपल्यामध्ये उपकाराची भावना न ठेवता सेवा केली पाहिजे. सेवा घेणार्याकडून कदाचित एखादा कटू अनुभव आला तरी सेवाकार्य करणार्या कार्यकर्त्याने संयमाने परिस्थिती हाताळली पाहिजे, असा सल्ला सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीळकंठ फडके यांनी दिला. संघाचे तालुका संघचालक विनायकराव चितळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघाची शाखा ही जशी ओळख आहे तसेच आता संघ म्हणजे सेवाकार्य ही परिभाषा समाजामध्ये रूढ होत चालली आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले. जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. महेश निघोजकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, कर्जत मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. शर्वाणी कुलकर्णी, नगरसेवक बळवंत घुमरे, उद्योजक गणेश वैद्य, जनकल्याण समितीचे विभाग कार्यवाह रविकिरण काळे, जिल्हा सहकार्यवाह गुरुराज कुलकर्णी, भगवान भगत, केमिस्ट असोसिएशनचे अनिल जोशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे कोडगिरे, चंद्रकांत कुढे, ओक वनौषधी प्रकल्पाचे अध्यक्ष अण्णा मोकल, कार्यवाह नंदकुमार मणेर, श्रीकांत ओक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper