मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात सलग दुसर्या दिवशी रविवारीही (दि. 11) परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटांसह बरसलेल्या पावसाने अनेक जिल्ह्यांत शेतीकामांना ब्रेक लावला, तर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत रविवारी पाऊस बरसला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तळकोकणात सलग दुसर्या दिवशीही मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाने जिल्ह्यात 14 ऑक्टोबरपर्यंत विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे.
परतीच्या पावसाने भातपिकाची नासाडी
खोपोली ः आठवडाभराच्या दिलाशानंतर शनिवारी (दि. 10) खोपोली-खालापूर परिसरात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस कोसळला. परतीच्या या अवकाळी पावसाने तयार झालेल्या तसेच कापणी झालेल्या भातपिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.
सध्या परिसरात सर्वत्र भातपीक तयार आहे. आठवडाभराच्या दिलाशामुळे व ढगाळ वातावरण कायम असल्याने पीक वाचवण्यासाठी आहे त्या स्थितीत अनेक ठिकाणी भात कापणीला सुरुवात झाली आहे, मात्र शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून भातपीक आडवे झाल्याने कोंब फुटण्याची स्थिती असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवसही परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने अधिक नुकसान होण्याची भीती वाढली आहे.
सध्या आमच्याकडे भातपीक तयार झाले आहे. कापणीसाठी मजूर आणि अन्य जुळवाजुळव सुरू असतानाच शनिवारी बरसलेल्या मुसळधार पावसाने आमचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात सर्वत्र पाणी भरल्याने कोंब फुटण्याची भीती आहे.
-दत्तात्रय दिसले, शेतकरी, केळवली
RamPrahar – The Panvel Daily Paper