Breaking News

साऊथच्या पाहुण्यांनी मराठीतही खाल्ला भाव…

दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटामधील कलाकार मुंबईत आले आणि त्यांनी चक्क भाव खाल्ला असे घडलंय. तुम्हालाही माहित्येय आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करणे ही तर आपली संस्कृती. मग तो साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील चेहरामोहरा का ना असेना?
(कॉफी शॉपमध्ये भेटूया यात आत्मियता नाही. डिहिटल पिढीतील हे फॅड जेन झी पिढीतही रूजलंय. सिधा पॉईट पे आ जाओ असा या पिढीचा रोखठोक बाणा आहे) ’पिक्चरच्या जगात’ तर ’स्टार पाहुणा’ हा कुठेही गेला तरी लक्ष वेधून घेणारच. सगळ्यांच्या नजरा खिळवून घेतो म्हणा. अशीच एक स्टार गेस्ट रश्मिका मंदाना. नावातच सगळं ग्लॅमर आलं. आयडेन्टीडी आली. बाकीचे प्रगती पुस्तक पुन्हा वेगळे सांगायलाच नको. झी गौरव पुरस्कार सोहळ्यात सगळ्यात जास्त तीच भाव खाऊन तिकडे दक्षिणेकडे गेलीदेखील. ज्यांनी या शोचा लाईव्ह अनुभव त्यातील अनेकांना ही कायमची सुखद आठवण आहे, ज्यांना या पुरस्कार सोहळ्याचा शो घरबसल्या टीव्ही अथवा मोबाईलवर ही एन्टरटेन्मेन्ट एन्जॉय केला, त्यामुळे टीआरपी वाढला.
साऊथचा स्टार मराठी इव्हेन्टसमध्ये येऊन भाव खाऊन जाणे याचाही एक सुखद फ्लॅशबॅक आहेच. असेच ते पाहुणे म्हणून आले आणि आपलं अस्तित्व अधोरेखित करण्यात यशस्वी ठरले. स्टार हा कुठेही गेला तरी स्टारच असतो मग तो दक्षिणेकडून आलेला का ना असे?
अशीच एक खास आठवण… 1993चा महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा… स्थळ दक्षिण मुंबईतील रंगभवन, धोबी तलाव. (त्या काळात राज्य चित्रपट महोत्सव रंगभवनच्या मोकळ्या म्हणजे ओपन एअर सभागृहात रंगे.)
या सोहळ्याचे विशेष म्हणजे, मराठी पुरस्कार सोहळ्यात नामांकन पद्धत सुरू झाली. तोपर्यंत सगळेच घोषित निकाल असत आणि फक्त विजेतेच तेवढे हजर राहत. आता या ’शो’चा रंगढंग बदलला. झगमगाट, ग्लॅमर, अधिक प्रमाणात गीत, संगीत, नृत्य, व्हिडिओ शूटिंग यांची रेलचेल आले.
या महोत्सवाने आपलं एकूणच व्यक्तिमत्व, लूक बदलले असता त्यासाठी ’प्रमुख पाहुणा’ही तसाच भारी लक्षवेधक हवा ना? तो होता, कमल हसन.
आता तो दक्षिणेकडील शिस्त आणि सवयीप्रमाणे या इव्हेन्टला वेळेवर आला आणि अगदी शांतपणे एकेक पुरस्कार आणि दरम्यानचा शो बघत होता. तो आला हेच विशेष होते. पण त्याला ’मराठीतील सोहळ्यातील’ भाषा वगळता बाकीचे सगळेच समजत असणार याची आम्हा उपस्थितांना जणू खात्री होती.
आम्हा सिनेपत्रकारांना त्याच्यामागचीच तिसरी रांग दिली असल्याने कमल हसनचे हावभाव दिसत होते. थोडे अवघडलेपण होते त्यात असं उगाच वाटलं. एक पुरस्कार देण्यासाठी त्याला स्टेजवर बोलावले तेव्हा त्याला बोलायची संधी दिली नाही, शेवटी ती दिली जाईल असे निवेदक त्याला समजावे म्हणून इंग्रजीत म्हणाला. त्यावर छान हसून कमल हसनने दाद दिली. कमल हसनच्या मंद हसण्यावरही अनेक जण फिदा आहेत ते प्रत्यक्षात दिसले.
अखेरीस ती वेळ आली. कमल हसनने स्टेजवरून समोरच्या उघड्या प्रेक्षागृहावर नजर फिरवली… आणि एकेक शब्द हळूहळू जोडत जोडत मराठीत बोलायला सुरुवात केली. अर्थात, क्षणात प्रचंड टाळ्या पडल्याच (अशी कोणत्याही क्षेत्रातील खूप खूप मोठी माणसं मराठीत बोलली की मराठी मन आनंदणे स्वाभाविक आहे. रोहित शेट्टीच्या मराठीत बोलण्याचे कौतुक वाटतयं ना?). आपण लहानपणी काही काळ सोलापूरला राहिल्याने थोडं थोडं मराठी बोलता येते असे म्हणतच त्याने छान इंग्रजीत बोलायला सुरुवात केली… बातमी झाली हो. कमल हसनने मराठीत भाषणाला सुरुवात केली केवढा मोठा सुखद धक्का हो. आजही तो लक्षात आहे.
कमल हसनचा असा मराठीशी संबंध आला मग रजनीकांतचे काय असा काहींच्या मनात प्रश्न आला असेलच. तो मूळचा शिवाजीराव गायकवाड. म्हणजे महाराष्ट्रीय. त्याला मराठीची ओढ असणारच. फक्त योग यायला हवा. निर्माते आनंद गायकवाड व बाबा ईस्माईल मिस्री यांनी तो आणला. तो सुखद योग आला, पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित विकी फिल्म्सच्या ’एक फूल चार हाफ’(1991) या मराठी चित्रपटाच्या मुहूर्ताला. गोरेगावच्या फिल्मीस्थान स्टुडिओत रजनीकांतच्या हस्ते हा मुहूर्त होताना तो आणि मराठीतील सुपर स्टार लक्ष्मीकांत बेर्डे हे एकत्र आले. मुहूर्ताचे दृश्य लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण यांच्यावर झाले. त्या काळात मुद्रित माध्यमे होती. चॅनेलचे जग असते तर या मुहूर्ताचे लाईव्ह कव्हरेज झाले असते. रजनीकांतचे साऊथ ढंगाचे मराठी बोल सर्वाधिक व्हिज्यु आणि लाईक्स मिळवणारे शो रिल ठरले असते. कौतुक असते हो अशा गोष्टीचे. ’श्रीवल्ली’ रश्मिका मंदानाने मराठमोळ्या लावणीवर नृत्याचा ठेका, ठेचा धरल्याचेही लय भारी कौतुक वाटले तसेच ते आहे.
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मिडियातून अन्य भाषेतील चित्रपट, सेलिब्रिटीज, म्युझिक यांचा ओघ वाढलाय. महाराष्ट्रीय चित्रपट रसिकांना साऊथच्या चित्रपट संस्कृतीची ओळख वाढतेय. ’नाटू नाटू’ने नाते आणखी घट्ट केलेय. भविष्यात मराठी चित्रपटाच्या इव्हेन्टसमध्ये साऊथचा तडका वाढला तर आश्चर्य नाही. म्हटलं ना, पाहुण्याचे स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे आणि अशा पाहुण्यांचे मनापासून स्वागत आहे.
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा (2025) या भव्य दिव्य दिमाखदार ऐतिहासिक चित्रपटाच्या निमित्ताने विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेली असता उपग्रह वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी तिला मराठीत बोलण्याची विनंती केली असता विकी कौशल अगदी तत्परतेने तिच्या मदतीला धावून आला आणि ती शब्द जोडून जोडून मराठीत बोलली याची चक्क बातमी झाली. डिजिटल मीडियात या बातमीला मोठ्याच प्रमाणावर लाईक मिळाले. कॉमेन्टस आल्या. साऊथचा स्टार मराठीत बोलल्याचा हा सुपरिणाम आहे.
एकदा तर झी मराठी मनोरंजन वाहिनीच्या एका स़ोहळ्यात डॉ. निलेश साबळेने याच रश्मिका मंदानाला विचारलेल्या प्रश्नांना बरं बरं मराठीत बोलून मराठीत उत्तरे दिली. इतकेच नव्हे तर ती मला जाऊ दे ना घरी या सुपर ड्युपर हिट गाण्यावर पक्कडबाज लावणी नृत्य सादर करून दाद मिळवली. एखाद्या पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपटातही रश्मिका मंदाना एकदम फाकडू नृत्य नक्कीच नाचेल. फार तर चित्रपटाचे बजेट वाढेल, पण त्याची परतफेड भन्नाट असेल त्याचं काय? पेराल तसं उगवेल आणि आज या साऊथच्या सेलिब्रेशजना सोशल मीडियात अगणित महाराष्ट्रीय फॉलोअर्स आहेत. किशोर बेळेकर दिग्दर्शित गांधी टॉक्स या संवादरहित चित्रपटात विजय सेतुपती यांच्यासोबत काम करताना उषा नाडकर्णी आणि नारायण जाधव हे महाराष्ट्रीय कलाकार कलालीचे इम्प्रेस झाले.
याचीच परतफेड म्हणून आपल्या सुबोध भावे अथवा अमृता खानविलकरला दक्षिणेकडील इव्हेन्टसमध्ये असेच पाहुणा म्हणून भाव खायला मिळू देत. ऐवीतेवी सयाजी शिंदे, रवि काळे, अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकरपासून श्रृती मराठे, नेहा पेंडसे, अंजली पाटील, राधिका आपटेपर्यंत अनेक मराठी चेहरे मोहरे तमिळ, कन्नड, तेलगू भाषेतील चित्रपटात आहेत, त्यांना तेथील इव्हेन्टसचे पाहुणे होण्याचा योग येऊ देत. मराठी सेलिब्रिटीज दुकानाचे उद्घाटन असो, पुरस्कार सोहळा असो, एन्टरटेन्मेंट इव्हेंटस असो, आपले मराठी कलाकार निश्चित छा जाऊ शकतात. मराठी सेलिब्रिटीजचा फिटनेस, आत्मविश्वास, आधुनिक फॅशन सेन्स, इंग्रजीत बोलणं भन्नाट आहे. ते मल्टीप्लेक्स फोर डी, व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला जात असलेल्या पिढीचे कलाकार आहेत. पूर्ण व्यावसायिक शिस्त असणारेही आहेत. ते एखाद्या चौकटीत अडकुन राहू इच्छित नाही.
आजच्या फिल्मी जगात ग्लॅमरची देवाणघेवाण महत्त्वाची… आज आपण मल्टीप्लेक्सला जावं तर मराठी व हिंदी चित्रपटासह साऊथचा धमाकेदार धमाकेदार चित्रपट, गुजराती चित्रपट, जगभरातील अनेक भाषेतील चित्रपट असं बरंच काही पहायला मिळतेय (ही सबटायटल्सची कृपा), ओटीटीवरही जगभरातील अनेक भाषेतील कन्टेन्ट (चित्रपट, वेबसिरिज) पहायला मिळतोय. आज मनोरंजन क्षेत्रात भाषेच्या भिंती मोडून पडल्यात. आजच्या जेन झी पिढीकडून या सगळ्या स्थित्यंतराचे सकारात्मक स्वागत आहे आणि तेच तर महत्त्वाचे असते.

  • दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply