मनसेचे नैनेश मुंढे भाजपत दाखल
कडाव : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील शिवसेना, भाजप व आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार यंत्रणेला अधिक बळकट करण्यासाठी, तसेच त्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी भाजपच्या सावेळे जिल्हा परिषद गटामध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सावेळे जिल्हा परिषद गटामधील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक रविवारी (दि. 7) सायंकाळी सावेळे चांधई येथे जिल्हा परिषद गट अध्यक्ष अंकुश मुने यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. या वेळी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष तथा माजी आमदार देवेंद्र साटम यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आघाडीतील घटक पक्षांत गोंधळलेली परिस्थिती आहे. तशी स्थिती महायुतीत नसून, महायुतीच्या उमेदवारासाठी अनुकूल वातावरण आहे, याचा फायदा महायुतीचे उमेदवार बारणे यांना होईल, असा दावा त्यांनी या वेळी केला.
भाजपचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, तालुका सरचिटणीस राजाराम शेळके, तालुका चिटणीस माधव कोळंबे, कार्यालयीन चिटणीस परशुराम म्हसे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नीलेश पिंपरकर, कर्जत विधानसभा सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष विलास श्रीखंडे, सावेळे पंचायत समिती गण अध्यक्ष मंगेश फुलवरे, पिंपळोली पंचायत समिती गण अध्यक्ष गुरुनाथ सोनावणे आदी पदाधिकार्यांसह कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोईरवाडी येथील मनसेचे नैनेश मुंढे, पंकज भोईर, हरेश भोईर, रूपेश भोईर आणि नितेश मुंढे यांनी त्यांच्या समर्थकांसह या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. नैनेश मुंढे यांची भाजपच्या कर्जत तालुका युवामोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
देशहितासाठी काम करणारे आतापर्यंतचे सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना जगात संबोधले जात आहे. महायुतीला मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान असणार आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा.
-देवेंद्र साटम, भाजप नेते
RamPrahar – The Panvel Daily Paper