नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
सिडको महामंडळातर्फे विविध आर्थिक स्तरांतील नागरिकांना आपल्या हक्काचे व पसंतीचे घर अथवा वाणिज्यिक बांधकाम, ते ही आपल्या उत्तम सोयी-सुविधांनी परिपूर्ण भूखंडावर उभारण्याची एक अनोखी जॅकप्लॉट योजना आणण्यात आली आहे. या योजने अंतर्गत सिडकोने नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून दिले असून या भूखंडांवर भूखंडधारकांना निवासी इमारती, बंगले, रो हाऊस दुकाने, कार्यालये विकसित करता येणार आहेत. या योजनेमुळे अल्प व मध्यम उत्पन्न गटांतील नागरिकांसह विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांना नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची व भूखंड विकसित करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. ई-लिलाव प्रक्रियेद्वारे या भूखंडांची विक्री सुरू असून त्यास नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आगामी काळात देखील सिडकोतर्फे नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये निवासी तथा निवासी व वाणिज्यिक भूखंड भाडेपट्ट्यावर विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नगर नियोजन व विकास क्षेत्रातील अग्रणी प्राधिकरण असणार्या सिडकोतर्फे सातत्याने आपल्या गृहनिर्माण योजनांद्वारे समाजाच्या विविध आर्थिक स्तरांतील व विशेषत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांकरिता घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात येतात. या नवीन जॅकप्लॉट योजनेंतर्गत नागरिकांना भूखंडावर आपल्या पसंतीचे निवासी अथवा वाणिज्यिक बांधकाम विकसित करता येणार आहे. या योजने अंतर्गत सिडकोने नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरूळ, उलवे, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल अशा विविध नोडमधील मोक्याच्या ठिकाणी असलेले भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून दिले आहेत. 40 चौ. मी. पासून ते 5000 चौ.मी. पर्यंत क्षेत्रफळ असणार्या भूखंडांचा यामध्ये समावेश आहे. या भूखंडांवर भूखंडधारकांना आपल्या पसंतीचे इमारती/बंगला/ रो हाऊस किंवा दुकाने अथवा कार्यालये असे निवासी अथवा वाणिज्यिक बांधकाम विकसित करता येणार आहे. या योजनेमुळे नवी मुंबईसारख्या सर्व भौतिक व सामाजिक पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असणार्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात सोयी-सुविधांनी परीपूर्ण भूखंडावर आपल्या पसंतीचे बांधकाम उभारण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे. तसेच कोविड-19 महासाथीमुळे बांधकाम क्षेत्रात निर्माण झालेल्या मंदीवर मात करून शहरातील बांधकाम क्षेत्राला या योजनेमुळे चालनाही मिळणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी व विकासकांनी या सिडकोच्या विशेष जॅकप्लॉट भूखंड विक्रीच्या या योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper