

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सिडकोचे वार्षिक स्नेहसंमेलन हे सिडकोतील कर्मचारी-अधिकार्यांच्या कला गुणांस वाव देणार व आपणा सर्वांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे, असे उद्गार लोकेश चंद्र, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी सिडको स्नेहसंमेलन 2019 निमित्त कर्मचार्यांना संबोधित करताना काढले. दि. 09 ऑगस्ट, 2019 रोजी सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे सिडको वार्षिक संमेलन आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी सिडकोतील उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे, मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोळी, मुख्य अभियंता एस. के. चौटालिया, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार रमेश डेंगळे, मुख्य अभियंता (नमुंआंवि) आर. बी. धायटकर,; व्यवस्थापक (कार्मिक) प्रशांत भांगरे, मुख्य लेखा अधिकारी चंद्रशेखर बिवलकर, शहर सेवा- 1 व 3 फैयाज खान, सिडको एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष निलेश तांडेल, सरचिटणीस जे. टी. पाटील, विनोद पाटील, मिलिंद बागुल यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहसंमेलनासारखे सांस्कृतिक कार्यक्रम कर्मचार्यांना येणारा ताण-तणाव दूर करण्यास सहाय्यभूत ठरतात. अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यातील कल्पकता व सृजनशीलतेला वाव देतात. यातून त्यांना एक प्रकारची उर्जा मिळते, असे प्रतिपादन श्री. लोकेश चंद्र यांनी केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी सिडकोच्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेत सिडकोतील कर्मचारी व अधिकार्यांमुळे सिडको सदैव यशोमार्गावरून वाटचाल करेल असा विश्वास व्यक्त केला. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे यांनी नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर बनवण्यामध्ये सिडकोतील कर्मचारी व अधिकार्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगत यासाठी प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या योगदानाचाही त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
निसार तांबोळी, मुख्य दक्षता अधिकारी यांनी स्नेहसंमेलन म्हणजे सिडको परिवाराला एकत्र आणणारा सोहळा असल्याचे सांगत सिडकोच्या पन्नास वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचे श्रेय हे निसंशयपणे सिडकोतील कर्मचारी व अधिकार्यांना असल्याचे सांगितले. निलेश तांडेल, अध्यक्ष, सिडको एम्प्लॉईज युनियन यांनी स्नेहसंमेलनासारखे सांस्कृतिक उपक्रम हे कर्मचार्यांच्या हिताचे असतात असे सांगत यामुळे कर्मचार्यांना वर्षभर काम करण्यासाठी एक प्रकारची सकारात्मक उर्जा मिळते असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरीबद्दल कार्मिक व लेखा विभागांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वैयक्तिक व सामूहिक क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकही प्रदान करण्यात आले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्रीमती प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको यांनी तर आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर भोईर यांनी केले. प्रमुख कार्यक्रम पार पडल्यांनतर दुपारच्या सत्रात सिडको आर्टिस्ट कम्बाइन ग्रुपतर्फे सादर करण्यात आलेल्या गाण्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. तसेच सायंकाळी थ्री इडियट या मराठी नाटकाचा प्रयोगही आयोजित करण्यात आला होता.
RamPrahar – The Panvel Daily Paper