नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा – सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचार्यांकरिता विशेष गृहनिर्माण योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 4,466 घरांची संगणकीय सोडत मंगळवारी (दि. 10) सिडको सभागृह येथे दुपारी 12 वाजता काढण्यात येणार आहे.
सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचार्यांकरिता एका विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ 27 जुलै रोजी करण्यात येऊन त्या अंतर्गत 4,466 घरे (सदनिका) पोलीस कर्मचार्यांकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या गृहनिर्माण योजनेंतर्गत पोलीस कर्मचार्यांकरिता तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये 4,466 सदनिका साकारण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटांकरिता उपलब्ध असणार्या या योजनेतील सदनिका केवळ मुंबई महानगर क्षेत्रात कार्यरत असणार्या पोलीस कर्मचार्यांकरिताच राखीव आहेत. एकूण 4,466 सदनिकांपैकी 1,057 सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि 3,409 अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत.
27 जुलैपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात होऊन या योजनेस उत्तम प्रतिसाद लाभला. अर्ज नोंदणी, शुल्क भरणा आदी सर्व प्रक्रिया पारदर्शक अशा ऑनलाइन पद्धतीने झाल्या. या सोडतीचे https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर वेबकास्टींगच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येऊन अर्जदारांना घरबसल्याही निकाल पाहण्याची सोय उपलब्ध आहे तसेच निकालाविषयीची अद्ययावत माहितीही या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper