पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेलमध्ये सिडकोने सुविधायुक्त पाचशे खाटांचे कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी भाजप नेते माजी नगराध्यक्ष संदिप पाटील यांनी केली आहे. या संदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदन दिले आहे.
नगराध्यक्ष पाटील यांनी निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सिडको महामंडळाने उरण-पनवेल येथील जमिनींवर मोठ्या प्रमाणत वसाहती वसविल्या आहेत तर काही ठिकाणी नव्याने वसाहती उभ्या राहत आहेत. येथील अंदाजित लोकसंख्या काही लाखांच्या घरात आहे. पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि रायगड जिल्हाधिकारी असे प्रशासन येथे कार्यरत आहेत. परंतु पनवेल, उरण तालुक्यात एकही मोठे कोविड सेंटर उपलब्ध नाही.
नवी मुंबईमध्ये कोरोना बधितांचा आकडा पाच हजारांच्यावर पोचला असून दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच खाजगी रुग्णालय देखील कोविड उपचाराकरिता कमीच आहेत. सध्य परिस्थितीत सर्व सामान्य जनतेला शासकीय/खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत व त्यामुळे रुग्ण दगावण्याच्या घटना घडत आहेत.
ज्या प्रमाणे सिडको महामंडळाने नवी मुंबईमध्ये मोठया प्रमाणावर विविध प्रकल्प राबविले व राबवित आहात त्याच धर्तीवर कोरोना विषाणूचा या संसर्गजन्य उपचारासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीत सर्व सुविधायुक्त कमीत कमी 500 बेडचे रुग्णालय (कोविड सेंटर) उभारावे व येथील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच या निवेदनाच्या प्रति आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव यांना देण्यात आल्या आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper