पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांना आता त्यांची जुनी ओळख परत मिळाली आहे. सिडकोने या गावांना आर-1, आर-2, आर-3, अशी नवीन नावे दिली होती, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जात होती. यामुळे, गावातील रहिवाशांनी आपली जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी दहा गाव समिती आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि या प्रयत्नांना आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ दिले आणि अखेरीस सिडकोने गावांना त्यांची जुनी नावे परत देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे चिंचपाडा, कोल्ही, कोपर, वाघीवली वाडा, वरचे ओवळे, कोंबडभूजे, तरघर, गणेशपुरी आणि उलवे ही गावे विस्थापित झाली, पण त्यांच्या खरी ओळख जपण्याऐवजी सिडकोने त्यांना आर-1, आर-2, आर-3, आर-4, आर-5 अशी नवीन नावे दिली आणि गावांचा इतिहास व संस्कृती पुसून टाकली. या गावांना त्यांची जुनी ओळख कायम राहावी यासाठी दहा गाव समिती आणि ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. त्याला आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ देऊन सिडकोने आता या गावांना जुनी ओळख कायम केली आहे. त्यानुसार आता जुन्या नावाची ओळख गावांना परत मिळाली असून सेक्टर आर-1 हे ’चिंचपाडा सेक्टर आर 1’, सेक्टर आर-2 हे ’चिंचपाडा सेक्टर आर 2’, सेक्टर आर-3 हे ’चिंचपाडा व कोल्ही सेक्टर आर 3’, सेक्टर आर-4 हे ’कोपर सेक्टर आर 4’, सेक्टर आर-5 हे ’वाघिवलीवाडा सेक्टर आर 5’, सेक्टर 1 हे ’वरचे ओवळे सेक्टर 1’, सेक्टर 24 हे ’उलवे सेक्टर 24’, सेक्टर 25 हे ’तरघर व कोंबडभुजे सेक्टर 25’, सेक्टर 25 ए हे ’कोंबडभुजे व गणेशपुरी सेक्टर 25’, सेक्टर 26 हे वाघिवली सेक्टर 26, तर सेक्टर 13 हे ’डुंगी सेक्टर 3’ या नावाने अर्थात जुन्या नावाने ओळखले जाणार आहे. सिडकोने पनवेल परिसरात होणार्या विमानतळाच्या बांधणीसाठी चिंचपाडा, कोल्ही कोपर, पारगाव, ओवळे, कोंबडभुजे, उलवेसारख्या भागातील जमिनी संपादित केल्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला म्हणून 22.5 टक्के प्रमाणे भूखंड देण्यात आले.
नवी मुंबई विमानतळ उभारताना जी गावे विस्थापित आली आहेत त्यांना सिडकोने भूखंड देऊन तेथे इमारती उभ्या राहिल्या. गावाचे गावपण जाते की काय असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडू लागला. भूखंडावर इमारती उभ्या राहिल्या. भूखंड सिडकोचे असल्याने त्यांना नावेही सिडकोने दिली. मात्र गावांची ओळख कायम रहावी यासाठी सिडकोकडे मागणी करण्यात आली आणि त्या मागणीला आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ दिले. या संदर्भात सिडकोने महत्वपूर्ण निर्णय घेत गावांना आता त्यांची जुनी ओळख कायम ठेवली आहे.
दरम्यान, आज आमच्या गावाचं पुनर्वसन होऊनसुद्धा त्याला मूळ नावानेच ओळख मिळाली, हे आमच्यासाठी अभिमानाचं आणि आनंदाचा क्षण आहे. गावाचं नाव जसंच्या तसं जपलं गेलं म्हणजेच आमच्या परंपरेला, इतिहासाला आणि आत्मसन्मानाला सलाम करण्यात आला आहे. ही महत्त्वाची बाब शक्य झाली ती आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या प्रयत्नांमुळे. गावकर्यांच्या भावना ओळखून, प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करून, प्रत्येक कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. आज पुनर्वसित गावातील प्रत्येक नागरिकांच्या मनात समाधान आहे की, घर नवं झालं, जागा नवी झाली, पण गावाचं नाव तेच राहिलं. आमदार साहेबांनी दाखवलेला हा संवेदनशील दृष्टिकोन खर्या अर्थाने लोकप्रतिनिधीपणाचे उत्तम उदाहरण आहे. गावकर्यांच्या वतीने आम्ही आमदार साहेबांचे मनःपूर्वक आभार मानतो, असे भाजप पनवेल तालुका पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ यांनी सांगितले.
विमानतळबाधित गावांना ओळख मिळून देण्यासाठी दहा गाव समिती आणि आम्ही पाठपुरावा केला होता. त्याला आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी पाठबळ दिले. त्यामुळे आता आम्हाला आमची जुनी ओळख मिळणार आहे. यामुळे आमच्या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून त्यांच्या चेहर्यावर समाधान दिसून येत आहे.
-समीर मदन केणी, पंचायत समिती अध्यक्ष, वडघर विभाग भाजप
RamPrahar – The Panvel Daily Paper