
चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून सध्या सुरू असलेले राजकारण महाराष्ट्राला खचितच शोभणारे नाही. सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? आत्महत्या केली असेल तर त्यामागील कारणे कोणती? हत्या झाली असेल तर ती कोणी केली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लोकांना हवी आहेत. परंतु याविषयी सुरू असलेल्या राजकारणाचे बदलते रंग पाहता ही उत्तरे मिळणे दिवसेंदिवस दुरापास्त होत चालले आहे की काय, असे वाटते.
सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला, त्याला आता जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत. इतका काळ लोटून देखील मुंबई पोलिसांचा तपास अजूनही चालूच आहे. अजूनही मुंबईत एफआयआर दाखल झालेला नाही हे कोड्यात टाकणारेच आहे. सुशांतसिंह राजपूतच्या अकाली मृत्यूला अल्पावधीत राजकीय रंग मिळाला कारण या प्रकरणात काही बड्या धेंडांची नावे गुंतली गेली. कंगना राणावतसारख्या बॉलिवुडमधील काही अभिनेत्यांनी या प्रकरणाला हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाही आणि खानदानी वर्चस्ववादाची फोडणी दिली. बराच काळ त्यावर चर्चा झाली. परंतु पाठोपाठ सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर हेतुपुरस्सर चालढकलीचा आरोप करून पाटणा येथे बिहार पोलिसांकडे तक्रार नोंदवली. बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन थोड्याफार चौकशीला प्रारंभ केला, तेव्हा मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य केले नाही. इतकेच नव्हे तर मुंबई महापालिकेने बिहारच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्याला थेट क्वारंटाइन करून टाकले. मुंबई पोलिसांचा हा पवित्रा बुचकळ्यात टाकणारा आहे. या संपूर्ण प्रकरणाला बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस असे स्वरुप आले. बिहारमध्ये होणार्या आगामी विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी हे मुंबई पोलिसांच्या व पर्यायाने महाराष्ट्र सरकारच्या असहकाराचे मूळ आहे, असे सांगितले जाते. बिहारमध्ये सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा मुद्दा निवडणूक प्रचारात अचानक केंद्रस्थानी आला ही वस्तुस्थिती आहे. परंतु सुशांतच्या मृत्यूला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे. सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांवर शिवसेनेच्या काही नेत्यांनी केलेली व्यक्तिगत चिखलफेक आणि मुंबई पोलिसांकडून तपासात ठोस माहिती पुढे आणण्यास झालेला विलंब हे प्रकरण चिघळण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरले आहे. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांबाबत तर अश्लाघ्यपणे काहीबाही छापून आले. वास्तविक सुरुवातीला सुशांतसिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जात होती त्यात फिल्मी जगतातील अनेक नामवंत व्यक्ती आणि राजकीय पक्षांनी देखील तशाच प्रकारचा सूर आळवला होता. या प्रकरणात जिला संशयाच्या पिंजर्यात उभे केले जात आहे त्या रिया चक्रवर्तीने देखील सीबीआय चौकशीची स्पष्ट मागणी केली होती. या संपूर्ण प्रकरणात भारतीय जनता पक्षाची कुठलीही भूमिका नाही. भाजपच्या काही नेत्यांनी आपली मते व्यक्त केली असतील, परंतु पक्षाने मात्र आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. तथापि देशभरातून होत असलेल्या मागणीनुसार याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवणेच इष्ट ठरेल असे वाटते. परंतु याचा अर्थ मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला जात आहे असा कोणी घेऊ नये. सर्वांचीच मागणी असेल तर सीबीआय तपासाच्या मागणीचा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्यात काही हशील नाही. त्यामुळे चिघळलेला राजकीय पेचप्रसंग महाराष्ट्राचीच छी-थू करणारा ठरतो हे ठाकरे सरकारने लक्षात घ्यायला हवे.
RamPrahar – The Panvel Daily Paper