पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ रविवारी (दि. 9) सायंकाळी 4 वाजता पनवेलमध्ये मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.
आपल्या देशात नागरिकत्व सुधारणा कायदा 12 डिसेंबर 2019 रोजी संसदेत पारित करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर मोहोर उमटवली. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांतील अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध, शिख, खिश्चन व पारसी या समुदायातील जे लोक धार्मिक छळामुळे 31 डिसेंबर 2014पूर्वी भारतात आले आणि या देशात राहत आहेत त्यांना भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी आणखी सहा वर्षे न थांबता ते लगेच मिळणार आहे. हा कायदा धार्मिक छळामुळे निर्वासित झालेल्यांना नागरिकत्व देण्यासाठी आहे, कोणाचेही नागरिकत्व रद्द करण्यासाठी नाही.
भारतातील कोणताही नागरिक मग तो हिंदू, मुस्लिम, दलित, विद्यार्थी वा सर्वसामान्य; नागरिकांचा या नागरिकत्व सुधारण कायद्याशी काहीही संबंध नाही. हा कायदा त्यांच्यासाठी लागू नसल्याने कोणतेही नुकसान होणार नाही. म्हणूनच कोणीही घाबरण्याचे कारण नाही, पण काही देशविघातक व्यक्ती व संघटना हेतुपुरस्सर या कायद्याबाबत समाजात संभ्रम निर्माण करून त्याद्वारे देशात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अशा समाजातील वाईट प्रवृत्तींना वेळीच लगाम लावायचा असेल, तर सर्व नागरिकांनी या कायद्याच्या बाजूने उभे राहिले पाहीजे. पनवेलकर नागरिकांनीही या कायद्याला समर्थन देण्यासाठी पुढे आले पाहिजे याकरिता रविवारी पनवेल शहर, खांदा कॉलनी व नवीन पनवेल परिसरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला खांदा कॉलनी येथून प्रारंभ होणार असून, रॅलीत नागरिकांनी व विविध संस्थांनी मित्रपरिवार व सहकार्यांसह बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी केले आहे.
Check Also
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper