पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, न्यू पनवेलच्या राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) विभागाचे सिनियर अंडर ऑफिसर अनुज धरमसिंह रणवा आणि सिनियर अंडर ऑफिसर मृण्मयी राजेंद्र धाडगे यांची दिल्ली येथे होणार्या प्रजासत्ताक दिन संचालनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. दिल्ली प्रजाकसत्ताक दिन संचलनासाठी राजपथावर जाणारे अनुज धरमसिंह रणवा आणि मृण्मयी राजेंद्र धाडगे हे सीकेटी महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिले एनसीसी कॅडेट्स आहेत. महाराष्ट्रातून एकूण 57 कॅडेट्सची निवड करण्यात आलेली आहे. त्यातून सीकेटी महाविद्यालयाच्या दोघांची निवड झाली आहे. या दोन्ही एनसीसी कॅडेट्स यांना त्यांच्या निवडीसाठी कॅप्टन डॉ. उद्धव तुकाराम भंडारे आणि नीलिमा तिदार यांचे कुशल नेतृत्व व योग्य मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे, प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील आणि एनसीसीचे कॅप्टन डॉ. उद्धव भंडारे, नीलिमा तिदार यांनी त्यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper