पनवेल : रामप्रहर वृत्त : हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार्र्या छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांच्या आदर्श घेऊन लोकांनी आता संघटित झाले पाहिजे. या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ सुरु केले आहे. त्यात लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी केले.
दैनिक सनातन प्रभातच्या मुंबई, ठाणे, रायगड, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचा 19 वा वर्धापनदिन सोहळा नुकताच भांडुप येथे पार पडला. या सोहळ्यात ‘सामाजिक दुष्प्रवृत्ती आणि सुराज्य स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर लेखक आणि व्याख्याते डॉ. परीक्षित शेवडे, दैनिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते. या सोहळ्याला सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला दैनिक सनातन प्रभातचे वाचक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते दैनिक सनातन प्रभातच्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे; मात्र आज ज्या प्रकारची पत्रकारिता समाजात चालू आहे, त्यामुळे लोक पत्रकारितेला नावे ठेऊ लागले आहेत. पुलवामा आक्रमण आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई आक्रमणानंतर एका राजकीय व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी काही वृत्तपत्रांनी पाकिस्तानची बाजू घेत थेट भारतीय लष्कराच्या कारवाईविषयी शंका उपस्थित केल्या; मात्र हे टाळून पत्रकारितेने देशभक्ती जपायला हवी, असे प्रतिपादन लेखक आणि व्याख्याते डॉ. परीक्षित शेवडे यांनी केले.
आज प्रतिदिन हिंदु धर्म, राष्ट्र, भारतीय संस्कृती, प्रथा-परंपरा यांविषयी संम्रभ निर्माण करणारे आरोप काही विरोधकांकडून सातत्याने केले जातात. या आरोपांना हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांच्याकडून उत्तर न दिल्यामुळे गेल्या दोन-तीन दशकांत आम्हाला कुणी विरोधक नाही, अशी धारणा धर्मविरोधकांची झाली होती; मात्र सनातन प्रभातमध्ये धर्म अन् राष्ट्र यांविषयावरील प्रत्येक आघाताचा वैचारिक प्रतिवाद सडेतोडपणे केला जातो. त्यामुळे विरोधकांचा वैचारिक पराभव होत असल्यामुळे ते बिथरले आहेत. ते खालच्या पातळीवर जाऊन सनातनला विरोध करत आहेत; मात्र न डगमगता सनातन प्रभात आपले कार्य करतच राहिल. या लढ्यात आता जनतेनेही उतरायला हवे, असे आवाहन दैनिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी अरविंद पानसरे यांनी केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper