Breaking News

सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन!

भारतीय राजकारणात उत्तरेकडचे राजकारण, दक्षिणेकडचे राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात विविध प्रकारचे कांगोरे आहेत. उत्तरेकडील राजकारणाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंतच्या नेत्यांनी वेगवेगळे किस्से ऐकविताना सांगितले आहे. काही आदर्श राजकारणी, समाजकारणीसुद्धा उत्तर भारतात पाहायला मिळाले आहेत, पण सांस्कृतिक, सुसंस्कृत राजकारणात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे दिसून येते. गडकरी हे नेहमी उदाहरण देताना महाराष्ट्राचा आवर्जून उल्लेख करतात.

उत्तरेकडे एका राजकीय पक्षाच्या नेत्याने दुसर्‍या राजकीय पक्षाच्या नेत्याकडे साधे पाहिले, बोलले तरी एक-दुसर्‍याकडे संशयाने पाहिले जाते, पण महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारण होत असल्याने ते सुदृढ लोकशाहीचे लक्षण मानले पाहिजे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच ’अर्थसंकल्प : सोप्या भाषेत’ हे पुस्तक लिहिले आणि त्याचे प्रकाशन महाराष्ट्र विधानभवनात मध्यवर्ती सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली विविध नेत्यांच्या भाषणांची जुगलबंदी म्हणजे एक बौद्धिक मेजवानीच म्हणावी लागेल.

मुळात अर्थसंकल्पाकडे साधारणपणे एक किचकट विषय म्हणून पाहण्यात येते. केंद्रात अर्थसंकल्प मांडला गेला की पूर्वी नानी पालखीवाला, प्रा. मधू दंडवते यांची भाषणे मुद्दाम आयोजित करण्यात येत असत. ही अर्थतज्ज्ञ मंडळी मराठी, इंग्रजीतून अर्थसंकल्प समजावून सांगत असत. नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेते असताना ’अर्थविचार’ नावाचे पुस्तक लिहिले होते आणि त्याचे प्रकाशन वांद्रे येथील रंगशारदाच्या सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, डॉ. मनोहर जोशी, प्रा. अरुण गुजराथी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. राणे यांचे खासगी सचिव राजेंद्र पाटील यांनी या पुस्तकासाठी परिश्रम घेतले होते. दैनिकाचे प्रकाशन असो की पुस्तकाचे प्रकाशन असो, त्या कार्यक्रमात हास्याचे फवारे उडणार हे ओघाने आलेच. त्यातही राजकीय नेते यांच्या पुस्तक

प्रकाशन समारंभात तर मिश्किलपणा, जुगलबंदी, कोपरखळ्या, चिमटे, टोमणे अशा विविध प्रकारच्या बाबींची अक्षरशः रेलचेल असते.

राज ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ’बाळ केशव ठाकरे अ फोटोबायोग्राफी’ हे पुस्तक मोठ्या मेहनतीने तयार केले. त्या पुस्तकाचे प्रकाशन गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात अटलबिहारी वाजपेयी, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, लालकृष्ण अडवाणी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, जॉर्ज फर्नांडिस, प्रमोद महाजन, शरद पवार, डॉ. मनोहर जोशी अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ ऐतिहासिक आणि अभूतपूर्व वातावरणात झाला. विधानभवनातसुद्धा असे अनेक प्रकाशन समारंभ झाले. डॉ. मनोहर जोशी हे लोकसभेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा समारंभ विधानभवनात झाला. अशा सर्वच कार्यक्रमांत बौद्धिक मेजवानीच मिळत आली.

हल्ली विविध प्रकारच्या वाहिन्यांवर सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात येते. त्यातही एक प्रकारची खमंग आणि रसरशीत मेजवानी उपस्थित श्रोत्यांना मिळते. हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन विधानभवनात झाले. त्या वेळी शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्याही कार्यक्रमात झालेली भाषणे ही कोपरखळ्या, टक्के-टोमणे यांनी फुललेली होती. अशा सर्वांचा एक दस्तावेज बनवायला हवा. पंढरीनाथ सावंत, वसंतराव देशपांडे (दादा), विजय वैद्य, यशवंत (आबा) मुळ्ये, अजय वैद्य आदींकडे तर अशा गोष्टी, घटनांचा खजिनाच आहे.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे असाच एक कार्यक्रम अभूतपूर्व आणि ऐतिहासिक झाला होता. विधानसभा निवडणुका झाल्या होत्या आणि त्या निवडणुकीच्या वेळी मतदान आणि मतमोजणी यामध्ये एक महिन्याचे अंतर होते. मतदान झाले होते आणि मतमोजणीची प्रतीक्षा होत होती. यादरम्यान मुंबईच्या महापौर बंगल्याच्या हिरवळीवर ’म्हारे डेरे आओ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले आदी सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या उपस्थितीत बहारदार मैफल रंगली. 1995 सालच्या या कार्यक्रमाची आठवण अजूनही काढण्यात येते. मुद्दा असा की महाराष्ट्र व महाराष्ट्रातील राजकारण किती सुसंस्कृत आहे याचा प्रत्यय पदोपदी येतो. महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली. जे एकमेकांच्या विरोधात लढले ते एकत्र येऊन महाविकास आघाडी बनवून सत्तेत बसले आणि ज्यांनी महायुती करून जनादेश मिळविला ते विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात बसले. त्यामुळे नक्की कोण कुणाबरोबर हेच कळेनासे झाले, परंतु याही वातावरणात देवेंद्र फडणवीस यांच्या ’अर्थसंकल्प : सोप्या भाषेत’ या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लेखक देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांनी हास्याचा धबधबा, कोपरखळ्या यांनी समारंभाची लज्जत वाढवितानाच सुसंस्कृत राजकारणाचा पुनर्प्रत्यय आला. राजकीय भूमिका व त्याचे विविध कांगोरे या प्रत्येक नेत्याच्या भाषणातून ऐकायला, अनुभवायला मिळाले. अर्थसंकल्पात फिस्कल मॅनेजमेंट, डेफिसिट, महसुली तूट, राजकोषीय तूट, वित्तीय तूट असे अनेक शब्द आहेत, जे किचकट वाटतात. सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावा म्हणून मी हे पुस्तक लिहिले आहे. केंद्राचा अर्थसंकल्प, राज्याचा अर्थसंकल्प आणि घरातील अर्थसंकल्प या गोष्टी सारख्याच असतात. फरक एवढाच की केंद्राचा, राज्याचा अर्थसंकल्प व्यापक असतो आणि घराचा मर्यादित असतो, असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यापेक्षा माझ्या बायकोचा पगार जास्त आहे म्हणून तो माझ्या लक्षात राहतो, असेही मिश्कीलपणे सांगितले.

’अर्थसंकल्प : सोप्या भाषेत’च्या प्रकाशनानिमित्त सत्ताधारी-विरोधक एकाच मंचावर आले. त्यामुळे या दिग्गजांनी एकमेकांना टोले आणि टोमणे मारले नसते तरच नवल, परंतु मराठीत अशा पद्धतीचं पहिलं पुस्तक लिहिलं गेलं असावं, असं म्हणत मीच पहिल्यांदा हे पुस्तक वाचणार आहे, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. अजितदादा आणि माझी आताच मैत्री झालीय, पण दादांनी मी माझ्या जुन्या मित्राची स्तुती करतोय याकडे जास्त लक्ष देऊ नये, असेदेखील ठाकरे म्हणाले.

एकूणच बहारदार कार्यक्रमाची रंगीत मैफल विधानभवनात पाहायला मिळाली आणि ती सतत मिळत राहावी. काही हृदयस्पर्शी घटनाही घडल्या. सुसंस्कृत महाराष्ट्राला मानाचा मुजरा!

– योगेश त्रिवेदी (9892935321)

Check Also

शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे

भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत …

Leave a Reply