मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर कोरोना पोहचल्यानंतर आता सेना भवनालाही कोरोनाचा विळखा बसला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भवनातील आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. कार्यालयात काम पाहणार्या काही कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोरोना रुग्ण आढळल्याने संपूर्ण सेना भवनात जंतुनाशक औषधांची फवारणी करून परिसर सील करण्यात आला होता, मात्र तरीही सेना भवनाभोवती कोरोनाचा विळखा वाढतच आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 19 जून रोजी शिवसेना भवनात गेले होते. त्या वेळी तिथे कोरोनाची लागण झालेले तीनही जण उपस्थित होते. इतकेच नाही तर त्या वेळी दिवाकर रावते, संजय राऊत, किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे या सर्वांची कोरोना चाचणी करावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या उंबरठ्याशी येऊन पोहचल्याने सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper