पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुक्यातील सोमटणे ते गिरवले गावच्या मध्ये रस्त्याच्या वळणावर एका स्कॉर्पिओ गाडीवर अज्ञात इसमाने समोरून बंदुकीने फायरिंग केले. या घटनेत गाडीतील दोघे जण बचावले असले, तरी हा हल्ला का व कशासाठी केला याचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.
फिर्यादी अनिलकुमार सचदेवा (58 रा. बेलापूर) हे सोमवारी (दि. 29) सायंकाळी त्यांच्या कार्यालयातील महिला कर्मचार्यासह कार्यालयीन वेळ संपल्यानंतर बाहेर पडले. पावसाळा असल्याने व रस्ता खराब असल्याने नेहमीच्या रस्त्याने न जाता पर्यायी रस्त्याने म्हणजेच सोमटणे-गिरवले गावच्या रस्त्यातून त्यांची स्कॉर्पिओ गाडी क्र. एमएच 46 एएल 4902ने जात असताना, ही गाडी गावाच्या मध्ये रस्त्याच्या वळणावर आली असता अज्ञात इसमाने त्यांच्या गाडीवर समोरून बंदुकीने फायरिंग करून तो पसार झाला. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांच्याकडे करताच सदरची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहा. पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांना देण्यात आली. घटनेची माहिती वरिष्ठांनी घेतली असून पोलीस निरीक्षक सतीश जाधव, सहा. पोलीस निरीक्षक विजय खेडकर आदींचे पथक या आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper