पनवेल मनपाही होणार उपक्रमात सहभागी
पनवेल : प्रतिनिधी
स्वराज्य महोत्सव अंतर्गत बुधवारी (दि. 17) सकाळी 11 वाजता राज्यात एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे. पनवेल महापालिका हद्दीतही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले. शासनाकडून आयोजिल्या गेलेल्या स्वराज्य महोत्सवात शेवटच्या दिवशी अर्थात बुधवारी सकाळी 11 ते 11.01 या एका मिनिटात सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायन केले जाणार आहे. यातही पनवेल महापालिका सहभागी होत आहे.
पनवेल महापालिका हद्दीत चारही प्रभागांतील मॉल्स, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, मंदिरे अशा विविध ठिकाणी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून समूह राष्ट्रगीत गायन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेच्या वतीने अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper