
पनवेल : वार्ताहर
थंडीच्या मोसमामध्ये पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी पार्टी करणे ही परंपरा आहे. याची अनेकांना भुरळ पडली असून अनेक ठिकाणच्या फार्म हाऊस आणि शेतामध्ये या पोपटी पार्ट्या होत असतात. अशाच प्रकारे पेण येथे सुद्धा हास्य जत्रेतील कलाकारांची नुकतीच पोपटी पार्टी झाली.
रायगडमधील लोक हे खाण्याच्या बाबतीत हौशी म्हणून ओळखले जात असून मुंबई बरोबरच रायगडमध्ये थंडीची चाहूल लागली असल्याने खवय्यांचे पाय आता ग्रामीण भागात फार्म हाऊस आणि शेताकडे वळू लागले असून वालाच्या शेंगा बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याने ग्रामीण भागात पोपटी पार्टीला सुरुवात झाली आहे. पोपटीची भुरळ ही महाराष्ट्राची हास्य जत्रेतील कलाकारांना सुद्धा लागली असून पोपटीची चव चाखण्यासाठी हे रतिमहारथी पेण येथील नंदू कल्याणकर यांच्या फार्महाऊसवर
अवतरले होते.
या वेळी अभिनेत्री विशाखा सुभेदार, अभिनेता पॅडी कांबळे, संगीतकार अमीर हडकर, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात, लेखक विनायक पुरुषोत्तम, गीतकार मंदार चोळकर, निखिल बने, वादक किशोर मोहिते, सुनील जाधव, श्याम बांगर, साहिल रेळेकर, आशिष महाडिक, गायिका मोनल कडलक, पोपटी शेफ प्रशांत शेडगे, दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे, वर्षा हडकर, कस्तुरी रेळेकर तसेच कल्याणकर कुटुंबिय हे त्यावेळी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper