कर्जत : बातमीदार
नेरळ येथील हुतात्मा स्मारक समितीतर्फे देण्यात येणारे हुतात्मा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या 2 जानेवारी 2020 रोजी नेरळ येथील हुतात्मा चौकात होणार्या सिद्धगड बलिदान कार्यक्रमात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वि. रा. देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन आणि गायक नंदेश उमप यांना यंदाचे हुतात्मा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
रायगड प्रेस क्लब व कर्जत प्रेस क्लबचा उपक्रम असलेल्या हुतात्मा स्मारक समितीच्या माध्यमातून दरवर्षी 2 जानेवारी रोजी कर्जत-नेरळ राज्यमार्गावरील माथेरान नाका येथे सिद्धगड बलिदान दिन साजरा करण्यात येतो. त्यात हुतात्मा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतात. हुतात्मा स्मारक समितीच्या नेरळ येथे झालेल्या बैठकीत यावर्षी वि. रा. देशमुख, उल्का महाजन आणि नंदेश उमप यांना हुतात्मा गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी या पुरस्काराची घोषणा केली असून, त्या वेळी संघटनेचे सल्लागार संतोष पवार यांच्यासह संजय मोहिते, धर्मानंद गायकवाड, दर्वेश पालकर, अभिषेक कांबळे, जयवंत हाबळे, संजय अभंगे, राहुल देशमुख, अजय कदम, गणेश पवार, दीपक पाटील, कांता हाबळे, अजय गायकवाड, सुमित क्षीरसागर, अॅड. हृषीकेश कांबळे आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper