कर्जत : बातमीदार
सन 1942च्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे आजाद दस्ता या क्रांतिकारी चळवळीचे प्रणेते माथेरानचे सुपुत्र वीर अण्णासाहेब उर्फ भाई कोतवाल आणि त्यांचे सहकारी वीर हिराजी पाटील यांनी भारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करताना ब्रिटिशांशी लढताना वीरमरण पत्करले. या रक्तरंजित लढ्यातील वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची 107वी जयंती माथेरानमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
माथेरानचे सुपुत्र वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करण्यासाठी समस्त माथेरानकरांनी हुतात्मा स्मारक येथून सकाळी शहरातून मशाल फेरी काढली होती. या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. त्यांच्या जन्मस्थळी त्यांच्या प्रतिमेस तसेच माधवजी उद्यान येथील
अर्धपुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी हुतात्मा स्मारक येथे वीर भाई कोतवालांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्य कार्यक्रमाची सुरुवात करताना माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते क्रांतिज्योत प्रज्वलनासह मशाल फेरी काढण्यात आली. हुतात्म्यांच्या नामफलकास कोतवालांचे पुतणे गणेश कोतवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कोतवालांच्या निवासस्थानी स्वातंत्र्यसैनिक धोंडू पवार यांच्या पत्नी सुशिला पवार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. माधवजी उद्यानातील कोतवालांच्या अर्धपुतळ्यास नगरसेवक नरेश काळे तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या स्तंभास नगरसेविका कीर्ती मोरे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या
अर्धपुतळ्यास उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी वीर भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक विद्या मंदिर तसेच प्राचार्य शांताराम गव्हाणकर विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत तसेच कोतवालांच्या जीवनावरील गीतांनी सूरमयी आदरांजली वाहिली. या वेळी माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, नाभिक संघटनेचे सुदाम शिंदे, दिलीप शिंदे, रघुनाथ विभार, विशाल कोकरे, बिपीन राऊत, सागर मंडलिक, महिला कार्यकारिणी रजनी विभार, शोभा कोरडे, अंजली शिंदे, संगीता शिंदे, कोतवाल ब्रिगेड अध्यक्ष रोहिदास क्षीरसागर, स्वाभिमानचे सागर पाटील तसेच नगरसेवक-नगरसेविका आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper