Breaking News

हैदराबादमध्ये ‘विराट’ वादळ

भारताची विंडीजवर सहा गडी राखून मात

हैदराबाद : वृत्तसंस्था

कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजवर सहा गडी राखून मात केली. विंडीजने दिलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहलीने नाबाद 94, तर लोकेश राहुलने 62 धावांची खेळी केली. यासोबतच भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे.

विंडीजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सावध सुरुवात केली होती. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या आठ धावा काढून माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी दुसर्‍या विकेटसाठी 100 धावा जोडल्या. यादरम्यान लोकेश राहुलने विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपले अर्धशतकही साजरे केले. तो 62 धावा काढून माघारी परतला.

यानंतर विराटने ऋषभ पंतच्या साथीने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भागीदारी रचत भारताचे आव्हान कायम ठेवले. पंत माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरही ठरावीक अंतराने बाद झाला. यानंतर विराटने शिवम दुबेच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आठ चेंडू बाकी ठेवत भारताने या सामन्यात बाजी मारली. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधला हा भारताचा सर्वोत्तम धावांचा पाठलाग ठरलेला आहे. विंडीजकडून पेरीने दोन, तर कायरन पोलार्ड आणि शेल्डन कोट्रलने प्रत्येकी एक बळी घेतला.

त्याआधी शेमरॉन हेटमायरचे धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला एविन लुईस आणि कायरन पोलार्डने दिलेल्या दमदार साथीच्या जोरावर पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने 207 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लेंडल सिमन्सला माघारी धाडत भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवातही केली होती, मात्र लुईस-हेटमायर आणि पोलार्ड या त्रिकुटाने हैदराबादच्या मैदानात चौफेर फटकेबाजी करीत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेलही सोडले. भारताकडून युजवेंद्र चहलने दोन, तर वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply