Breaking News

40 मिनिटांचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत; कशेडी घाट पर्यायी बोगद्याचे काम युद्धपातळीवर

अलिबाग : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील  कशेडी घाटाला पर्याय म्हणून बोगदा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या बोगद्यामुळे 40 मिनिटांच्या या प्रवासाचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत कापता येणार आहे. त्याचबरोबर अपघातदेखील टळणार आहेत. कशेडी घाट पोखरून तयार केला जाणारा हा बोगदा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्यातील चौपदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. याच मार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते रत्नागिरी जिल्ह्यातील खवटी असा कशेडी घाट आहे. या घाटातून प्रवास करताना वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात, तर रसायनवाहू वाहने घाटात कलंडल्याने वाहतूक कोंडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यटकांबरोबरच गणेशोत्सव व शिमगोत्सवात येथे मोठी वाहतूक कोंडी होते. बोगद्यामुळे या सर्व समस्या सुटणार आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर बोगद्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीला देण्यात आले आहे. साधारण दोन किलोमीटरच्या या अंतरात ये-जा करण्यासाठी दोन स्वतंत्र बोगद्यांत एकूण सहा मार्गिका असतील. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली 200 मजूर येथे दिवसरात्र काम करीत आहेत. या कामासाठी तब्बल 441 कोटी रुपये खर्च होणार असून एप्रिल 2021मध्ये हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर डागडुजीची जबाबदारी चार वर्षे ठेकेदार कंपनीची राहणार आहे.

बोगद्याची लांबी साधारण 1.84 किलोमीटर इतकी आहे. आवश्यक व पुरेशी यंत्रसामुग्री उपलब्ध असल्याने काम जोमाने सुरू आहे. पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यात बोगद्याचे काम पूर्ण होईल.-स्टोजन, प्रकल्प अधिकारी 

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply