Breaking News

90 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील कशेळे येथील अनुबाई विष्णू हरपुडे या 90 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. विशेष म्हणजे मुंबई, पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता गावातीलच ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन त्या आठवडाभराने सुखरूप घरी आल्या आहेत.
कशेळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयराम हरपुडे यांच्या मातोश्री आणि पंचायत समिती सदस्य सुरेखा अरुण हरपुडे यांच्या आजेसासू असलेल्या अनुबाई हरपुडे यांना मागील आठवड्यात बरे वाटत नव्हते. ताप व खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने त्यांना 12 सप्टेंबर रोजी गावातीलच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांना त्यांची अँटीजन टेस्ट केली असता, त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले होते, पण दोन दिवसांनी त्यांना श्वसनाचा त्रास होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले.
डॉ. विक्रांत खंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हरपुडे आजींवर उपचार सुरू झाले. त्यांची ऑक्सीजन लेवल कमी जास्त होत होती. तरीही मला मुंबई-पुण्याला नेऊ नका असा त्यांचा आग्रह होता. डॉक्टरांचे प्रयत्न आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या 90 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. त्यांना घरी आणल्यानंतर नातवंडांनी त्यांचे आरती ओवाळून स्वागत केले.

कोरोना या रोगाच्या भीतीने माणूस घाबरतो, परंतु कोरोना झाला आहे हे लपवून ठेवण्यापेक्षा लगेचच दवाखान्यात जाऊन औषधे घेतली की आजारी माणूस बरा होतो. माणसाची इच्छाशक्ती का काय म्हणतात  ते पाहिजे.
-अनुबाई हरपुडे, कशेळे, ता. कर्जत

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply