नागपूर ः प्रतिनिधी
उपराजधानीने आतापर्यंत तापमानात आघाडीवर असलेल्या अकोला शहराला मागे टाकले असून पारा 1.5 अंश सेल्सिअसने वाढून 46.3 वर पोहोचला आहे. या मोसमातील ही उच्चांकी तापमानाची नोंद आहे. दरम्यान, हवामान खात्याने आणखी चार दिवस उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा दिल्याने नागपूरकरांना सूर्यनारायणाचा कोप झेलावाच लागणार आहे.
उपराजधानीत विकासकामे वेगात सुरू आहेत. एकीकडे सिमेंटचे जंगल उभे राहत आहे, तर दुसरीकडे सिमेंटच्या रस्त्यांचा वेगदेखील वाढत आहे. त्यामुळे तापमान वाढण्याचे संकेत नागपूरकरांना आधीच मिळाले होते. त्यात आता सूर्यनारायणानेही वक्रदृष्टी फिरवल्याने कधी नव्हे ते पारा 46 अंशांच्या पार गेला आहे. राजस्थानकडून येणार्या उष्ण आणि कोरड्या वार्यामुळे उन्हाचा तडाखा आणखी वाढतच चालला आहे.