भाजपची मागणी; अलिबाग, रोहा, मुरूड, खोपोलीत निदर्शने; निवेदन सादर
अलिबाग : प्रतिनिधी
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नबाब मलिक यांचा अलिबाग तालुका भाजपतर्फे गुरुवारी (दि. 24) निषेध करण्यात आला. मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांना भेटून निवेदन दिले. यावेळी संतोष पाटील, सतिश लेले, कुर्डूस सरपंच अनंत पाटील, सुनील दामले, शैलेश नाईक, जगदीश घरत, समिर राणे, किशोर पाटील, राजू जाधव उपस्थित होते. 1993 साली मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत मृत्यू पावलेल्या निरपराध नागरिकांना भाजप कार्यालयात श्रद्धांजली वाहून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
धाटाव : प्रतिनिधी
मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी इडीने मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. कोर्टाने त्यांना तीन मार्चपर्यंत कोठडी दिली. हा राष्ट्राच्या सुरक्षेचा व अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीचे निवेदन भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग यांनी गुरुवारी (दि. 24) रोहा तहसीलदार कविता जाधव यांना दिले. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनेही केली. रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कोनकर, जिल्हा चिटणीस प्रशांत सपकाळ, शहर अध्यक्ष निलेश धुमाळ, युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष राजेश डाके, महिला मोर्चा शहर अध्यक्षा जयश्री भांड, कामगार सेलचे राजेश डाके, सोशल मीडिया संयोजक सनिल इंगावले, अमर वारंगे, सरपंच रघुनाथ कोस्तेकर आदी भाजप पदाधिकार्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष आंदोलन चालूच ठेवेल, असे अमित घाग यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मुरूड : प्रतिनिधी
अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्डरिंगसंदर्भात अंमलबजावणी संचालयाने कारवाई केली आहे तसेच मंत्री मलिक यांचा देश विघातक शक्तीशी असलेल्या घनिष्ठ संबंधाबाबत निषेध नोंदवत मुरूड तालुका भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 24) जोरदार घोषणाबाजी करून तहसीलदार रोहन शिंदे यांना निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी मंत्री नबाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. मुंबई बॉम्बस्फोट कटामधील देशद्रोही आरोपींकडून करोडो रुपयांची जमीन कवडीमोल दराने खरेदी करून देशविघातक कारवाई करणार्यांसोबत घनिष्ठ संबंध असणार्या मंत्री नवाब मलिक यांचा या निवेदनात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुरूड तहसील कार्यालयाच्या आवारात ठाकरे सरकार हाय हाय, नवाब मलीक मुर्दाबाद अशा असंख्य घोषणाही दिल्या. भाजपचे मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, जिल्हा कमिटी सदस्य जनार्धन अण्णा कंधारे, शहराध्यक्ष उमेश माळी, तालुका उपाध्यक्ष बाळा भगत, महेश मानकर, तालुका सरचिटणीस नरेश वारगे, तालुका संघटक प्रवीण बैकर, युवामोर्चा अध्यक्ष अभिजित पानवलकर, जगदीश पाटील यांच्यासह शहरातील कार्यकर्ते या वेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
खोपोली : प्रतिनिधी
केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईनंतर अटक झालेल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी खोपोलीत भाजपतर्फे गुरुवारी (दि. 24) शहरातील दीपक चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. भाजपचे खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, सहचिटणीस प्रमोद पिंगळे, संभाजी नाईक, जिल्हा कार्यकारीणी सदस्य स्नेहल सावंत, शहर कोषाध्यक्ष राकेश दाबके, युवा नेते सचिन मोरे, माजी नगरसेवक सूर्यकांत देशमुख, माजी नगरसेविका अनिता शहा, शहर युवा मोर्चा सरचिटणीस विनायक माडपे, महिला मोर्चाच्या विमल गुप्ते, शक्ती प्रमुख सिद्धेश पाटील, बूथअध्यक्ष करण यादव, प्रदीप दळवी, सुनिती महर्षी यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.