Breaking News

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचे आमरण उपोषण

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी शनिवार (दि. 26)पासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला.
काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी उपोषणासंदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार ते उपोषणाला बसले आहेत. उपोषण सुरू करताना संभाजीराजे म्हणाले की, सगळ्यांना एका छताखाली कसे आणता येईल या दृष्टीने हा लढा आहे. माझा लढा 30 टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी आहे. त्यांच्या आरक्षणासोबत इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आहे.
मी 2007पासून महाराष्ट्र फिरतोय. मी आजच टपकलो नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने मी महाराष्ट्र पिंजून काढला. यातून आम्ही आरक्षण समाजाला का गरजेचे आहे याची जनजागृती केली होती. 2013मध्ये मी महाराष्ट्रात फिरत असताना मराठा समाजाच्या संघटनांनी एकत्र येऊन सांगितले की, राजे तुम्ही नेतृत्व करणे गरजेचे आहे. त्यामुळेच 2013मध्ये आझाद मैदानात आम्ही मोर्चा काढला होता, असे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र मागासवर्ग आयोगाची घोषणा शुक्रवारी केली. या संदर्भात विचारणा केली असता संभाजीराजे यांनी त्यावर निशाणा साधला. एक मागासवर्ग आयोग असताना फक्त मराठा समाजासाठी वेगळा आयोग तयार करता येतो का? हा प्रश्न आहे. फक्त मराठा समाजाला खूश करण्यासाठी असे वक्तव्य येता कामा नये. माझ्या माहितीनुसार हे कायदेशीर नाही, असे ते म्हणाले.
तुम्ही या अर्थसंकल्पात आमच्या मागण्यांसदर्भात तरतूद करा. ब्लू प्रिंट दाखवा. आर्थिक नियोजन सांगा. तुमच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या करा, अशी मागणी या वेळी संभाजीराजेंनी केली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply