विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची ग्वाही
महाड : प्रतिनिधी
शिवकालीन जागृत देवस्थान असलेल्या महाडच्या विरेश्वर मंदिराला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केले.
महाडचे ग्रामदैवत विरेश्वर देवस्थानच्या छबिना उत्सवाला शिवरात्रीपासून प्रारंभ झाला आहे. या मंदिराचा छबिना उत्सव कोकणात प्रसिद्ध आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी विरेश्वराचे दर्शन घेतले त्या वेळी बोलते बोलत होते. पर्यटनाच्या माध्यमातून या देवस्थानाला प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले.
विरेश्वर मंदिर परिसराच्या सुशोभिकरणासाठी भाजप सरकारच्या काळात निधी दिला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कामाला स्थगिती आली असून रखडलेले हे काम आपण पाठपुरावा करुन पुन्हा सुरू करू, असा विश्वासही दरेकर यांनी या वेळी व्यक्त केला.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, तालुका सरचिटणीस महेश शिंदे, शहर अध्यक्ष निलेश तळवटकर, निलीमा भोसले, मंजुशा कुद्रीमोती, नाना पोरे, चंद्रजित पालांडे आदि या वेळी उपस्थित होते. दरम्यान देवस्थानच्या वतीने दरेकर यांचा सत्कार करण्यात आला.