Breaking News

सिडको गृहप्रकल्पात काही महिन्यातच भीषण पाणीटंचाई; प्रशासनाचे दुर्लक्ष

नियोजन नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप

खारघर ः प्रतिनिधी

खारघरमधील बागेश्री गृहसंकुलातील नागरिकांचे मागील महिनाभरपासून पाण्याचे प्रचंड हाल सुरू आहेत. सिडको महामंडळाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न केल्याने रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत भाजपतर्फेही पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र त्याकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

सिडको गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2018 साली लॉटरी पद्धतीने घणसोली, द्रोणागिरी, तळोजा, खारघर आणि कळंबोली येथे सुमारे 14 हजार सदनिका विक्रीकरिता काढल्या होत्या. कोरोनामुळे ताबा देण्यास उशिर झालेल्या घरांचा ताबा देण्यास जुलै 2021 पासून सुरुवात झाली. खारघर सेक्टर 40 येथील प्रकल्पातील 1100 घरांचा ताबा रहिवाशांनी घेतला आहे. सध्या 700 नागरिक वास्तव्यासाठी आलेले आहेत. मात्र आता रहिवाशांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. महिनाभरापासून संकुलात पाणी येत नाही. पाणी आलेच तर काही मिनिटांतच पाणीपुरवठा बंद होत आहे. मागील काही दिवसांत पाईपलाईन दुरूस्तीच्या कामामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. मात्र हे काम मार्गी लागल्यावर देखील संकुलात पाण्यावाचून हाल सुरू आहेत.

नागरिकांना टँकरने पाणी पोहविण्याचे आश्वासन देणार्‍या सिडको व्यवस्थापन हा प्रकार गांभिर्याने घेत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काही महिन्यांपूर्वी घरांचा ताबा मिळाला आणि पहिल्याच पावसाल्यात पाण्याची भीषण समस्या सिडकोने उभारलेल्या प्रकल्पात होते हे दुर्दैवी आहे. सिडको प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा.

-निलेश दळवी, रहिवासी, बागेश्री गृहप्रकल्प खारघर

यासंदर्भात माहिती घेतली जाईल. पाण्याची समस्या निर्माण झाली असेल तर पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना ही समस्या मार्गी लावण्याची सूचना देण्यात येईल.

-प्रिया रातंबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

Check Also

शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे

भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत …

Leave a Reply