नवी मुंबई ः प्रतिनिधी
वाशी येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडलेला आहे. त्यात सिडकोकडून भवनाची जागा बदलण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे. हाच धागा पकडत 21 वर्ष रखडलेल्या या भवनाची जागा बदलण्यात येणार असल्याचे सांगत जागा न बदलता आहे तिथेच भवन उभारावे, अशी मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत केली.
वाशी सेक्टर 30 येथे विविध राज्यांनी आपल्या वास्तू या परिसरात बांधलेल्या आहेत. त्या भवनांमध्ये राज्याची त्या त्या राज्यांची संस्कृती विविध कार्यक्रमांद्वारे टिकवली जाते. मात्र इतर राज्यांचा पाहुणचार करणार्या महाराष्ट्र सरकारला मात्र भूखंड उपलबद्ध होऊन देखील गेल्या 21 वर्षांत महाराष्ट्र भवन उभारता आलेले नाही, याची खंत नवी मुंबईकरांसह इतर नागरिकदेखील व्यक्त करत असतात. 2021 च्या अर्थसंकल्पात आ. मंदा म्हात्रे यांच्या पाठपुरव्याला यश येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जवळपास 26 कोटींचा निधी भवन उभारण्यासाठी ठेवत असल्याची घोषणा केली होती. मात्र 2022 उजाडले तरी त्याबाबत काहीही हालचाल न झाल्याने हे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे या वर्षी तरी महाराष्ट्र भवन उभारण्याचे शासनाने मनावर घ्यावे, अशी मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper